yuva MAharashtra गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश; आगळावेगळ्या स्वागत उपक्रमाने वेधले लक्ष

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश; आगळावेगळ्या स्वागत उपक्रमाने वेधले लक्ष

जत वार्ता न्यूज
By -

जत, प्रतिनिधी :
     साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या शुभदिनी जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक १, जत येथे पहिलीच्या वर्गासाठी १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहात प्रवेश घेत आपल्या शैक्षणिक प्रवासाची मंगल सुरुवात केली. यावेळी शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आगळावेगळे उपक्रम राबविण्यात आले.
     नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना त्यांच्या पायांना कुंकवामध्ये बुडवून पानावर ठसे घेण्याची प्रतीकात्मक कृती करण्यात आली. “लहान पावलांनी घेतलेले हे ठसे आयुष्याच्या मोठ्या यशाची सुरुवात ठरतील,” या भावनेतून हा उपक्रम साकारण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील पहिल्या शैक्षणिक टप्प्याची आठवण जपणारा हा क्षण विशेष ठरला.
     शाळा परिसर आकर्षक रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेसह सजावट करण्यात आली होती. यंदा पुस्तकांची गुढी उभारून महामानवांच्या ग्रंथांसह भारतीय संविधानाचे पूजन करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला वेगळेच शैक्षणिक व संस्कारमूल्य प्राप्त झाले.
     विद्यार्थी व पालकांसाठी उभारण्यात आलेला सेल्फी पॉईंट विशेष आकर्षण ठरला. पालकांनी आपल्या पाल्यांसोबत आनंदाने छायाचित्रे काढत या क्षणांची आठवण जपली. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी श्री. धोत्रे, गटशिक्षण अधिकारी राम फरकांडे, विस्तार अधिकारी अन्सार शेख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष देवकर, उपाध्यक्ष रोहिणी जाधव तसेच शिक्षकवृंद आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
     मुख्याध्यापक संभाजी कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी माजी अध्यक्ष मोहन माने-पाटील, जत नगरपालिका अधिकारी सौ. राणी पाटील, शिक्षण सभापती इमरान गवंडी, बंडू शेख, प्रकाश मोटे, योगेश एडके, बाळू चव्हाण, प्रशांत संकपाळ, अश्विनी निकम, आप्पासाहेब निकम, डॉ. माळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत, शैक्षणिक साहित्याचे वितरण आणि सत्कार सोहळा पार पडला. संपूर्ण शाळा परिसर आनंद, उत्साह आणि प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला होता.