yuva MAharashtra जत शहरातील विकासकामांची ‘चाळण’ | पाणीपुरवठा योजनेमुळे रस्त्यांची दुरवस्था; नागरिक त्रस्त

जत शहरातील विकासकामांची ‘चाळण’ | पाणीपुरवठा योजनेमुळे रस्त्यांची दुरवस्था; नागरिक त्रस्त

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क | Jath ;
     जत नगरपरिषदेच्या विकासकामांमुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून “असा विकास नको” असे म्हणण्याची वेळ जतकरांवर आली आहे. शहरातील जवळपास प्रत्येक रस्त्यावर नळ पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्यासाठी खड्डे खोदण्यात आले असून त्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही, अशी तीव्र नाराजी नागरिकांतून व्यक्त होत आहे.
     जत नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा ठेकेदाराने शहरातील बहुतांश रस्त्यांवर पाईपलाईन टाकताना मोठ्या प्रमाणात खोदकाम केले. मात्र खड्ड्यातून काढलेला मुरूम रस्त्यावरच टाकल्याने वाहनचालक, दुचाकीस्वार तसेच पादचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उडणाऱ्या धुळीमुळे आरोग्याच्या तक्रारीही वाढत असल्याचे नागरिक सांगत आहेत.

सिमेंट रस्त्यांचीही वाट लागली;
     शहरातील ज्या ठिकाणी सिमेंट काँक्रेटचे रस्ते आहेत, त्या रस्त्यांचीही मोठी हानी झाली आहे. पाईपलाईन पुरल्यानंतर रस्ता पूर्ववत करणे ठेकेदाराची जबाबदारी असताना अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रेटचा मलबा तसाच पडून आहे. त्यामुळे अबालवृद्धांसह सर्वसामान्यांना वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.

भूमिगत गटार योजनेची भर;
     शहरात लवकरच भूमिगत बंदिस्त गटार योजनेची कामे सुरू होणार असून त्यासाठी लागणाऱ्या मोठ्या पाईप शहरात दाखल झाल्या आहेत. आधीच पाणीपुरवठा योजनेमुळे रस्त्यांची अवस्था बिकट असताना नव्या योजनेमुळे आणखी खोदकाम होणार असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या पाईपा नेमक्या कोठे टाकल्या जाणार आणि त्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती कशी होणार, याबाबत स्पष्टता नसल्याची टीका होत आहे.

कोट्यवधींचा निधी वाया?
     फक्त वर्षभरापूर्वी लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेले डांबरी व सिमेंट काँक्रेट रस्ते पुन्हा उखडले गेल्याने खर्च केलेला निधी वाया गेल्याची भावना शहरवासीयांत आहे. नियोजनाअभावी विकासकामे राबविली जात असल्याचा आरोपही पुढे येत आहे.

लोकप्रतिनिधींनी दाखवावी आक्रमकता;
     जतचे आमदार गोपीचंद पडळकर व नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी यांनी नगरपरिषद निवडणुकीदरम्यान जत शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे आश्वासन दिले होते. शहरवासीयांना दाखविण्यात आलेली विकासाची ‘डिजिटल मेजवानी’ आता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, मोठा निधी आणून कामांमध्ये समन्वय साधावा आणि रस्ते पूर्ववत करण्याबाबत प्रशासनाला कठोर सूचना द्याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
     सध्या तरी जत शहरात विकासाच्या नावाखाली रस्त्यांची झालेली चाळण हा नागरिकांसाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कामांची गुणवत्ता व वेळेत दुरुस्ती सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.