yuva MAharashtra १ लाख ३४ हजार युवा प्रशिक्षणार्थी पुन्हा रस्त्यावर | मुंबईच्या आझाद मैदान येथे मंगळवारपासून बेमुदत आंदोलन; हभप तुकाराम बाबा महाराज यांची माहिती

१ लाख ३४ हजार युवा प्रशिक्षणार्थी पुन्हा रस्त्यावर | मुंबईच्या आझाद मैदान येथे मंगळवारपासून बेमुदत आंदोलन; हभप तुकाराम बाबा महाराज यांची माहिती

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क | sangli :
     विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘लाडका भाऊ’ म्हणत सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने राज्यातील १ लाख ३४ हजार युवकांना ‘मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी’ योजनेतून ११ महिन्यांचे प्रशिक्षण व रोजगार दिला; मात्र मुदत संपल्यानंतर या युवकांवर पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी आणि युवा प्रशिक्षणार्थींना सन्मानाने पुन्हा सेवेत घ्यावे, या मागणीसाठी मंगळवारपासून मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यभरातील युवा प्रशिक्षणार्थी बेमुदत आंदोलन छेडणार असल्याची घोषणा चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत केली.

अनोखे ‘चॉकलेट आंदोलन’;
     हिवाळी अधिवेशन सुरू असताना युवा प्रशिक्षणार्थी संघटनेसमवेत तुकाराम बाबा महाराज यांनी रस्त्यावर झोपत अनोखे ‘चॉकलेट आंदोलन’ केले होते. अधिवेशनावर ‘चॉकलेट मोर्चा’ काढत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. “लहान मुलांना चॉकलेट देऊन जसे वेड्यात काढले जाते, तसेच १ लाख ३४ हजार युवकांना आश्वासनांच्या गोड बोलांनी वेड्यात काढण्यात आले,” अशी टीका त्यांनी केली.
     यापूर्वी मुंबई, सांगली, देहू, नाशिकसह राज्यभर आंदोलने करूनही शासनाने मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

पगार कधी देणार?
     ११ महिन्यांचे काम करूनही अनेक प्रशिक्षणार्थींना मागील काही महिन्यांपासून पगार व मानधन मिळालेले नाही. थकीत मानधन तत्काळ अदा करावे, तसेच योजनेतून बाहेर पडलेल्या युवकांना ठोस रोजगार द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

बेमुदत आंदोलनाचा इशारा;
     माजी खासदार हरिभाऊ राठोड, बालाजी पाटील चाकूरकर, अनु चव्हाण, प्रकाश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारपासून सुरू होणारे आंदोलन बेमुदत असेल. न्याय मिळेपर्यंत राज्यातील ३६ जिल्ह्यांतील पदाधिकारी आणि युवा प्रशिक्षणार्थी आंदोलनात सहभागी राहतील, असे तुकाराम बाबा महाराज यांनी स्पष्ट केले.

घोषणा नको, कृती हवी;
     राज्याचे मंत्री भरत गोगावले व उदय सामंत यांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती. या योजनेचे जनक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेण्यात आली होती. निवडणुका संपल्यानंतर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.
    दरम्यान, मंत्री मंगलप्रभात लोंढा यांनी नागपूर अधिवेशनात युवा प्रशिक्षणार्थींसाठी १० टक्के राखीव जागा व सहा लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात अद्याप कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही.
     “घोषणा करून युवकांची दिशाभूल करण्याऐवजी शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा व युवा प्रशिक्षणार्थींना न्याय द्यावा,” अशी मागणी तुकाराम बाबा महाराज यांनी केली.