जतवार्ता न्यूज नेटवर्क | मिरज :
सांगली जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये जाडर-बोबलाद जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या सौ. सावित्री तम्मणगौडा रविपाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) सांगली जिल्हा कोअर कमिटीच्या वतीने मिरज येथील शासकीय विश्रामगृहात विशेष सत्कार करण्यात आला. जनसेवेच्या प्रवासातील हा एक सन्माननीय टप्पा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
हा सत्कार माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या शुभहस्ते पार पडला. कार्यक्रमास माजी खासदार संजयकाका पाटील, माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक, जत विधानसभेचे माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यासह राष्ट्रवादी कोअर कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्य व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना तम्मणगौडा रविपाटील यांनी सांगितले की, हा सत्कार केवळ वैयक्तिक नसून जाडर-बोबलाद गटातील प्रत्येक मतदाराच्या विश्वासाचा सन्मान आहे. मतदारांनी दिलेल्या जबाबदारीचे सोने करून विकासकामांना प्राधान्य देत जनसेवेचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीनंतर सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी एकत्रितपणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटी व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यकर्त्यांनी जल्लोषात अभिनंदन करत पुढील काळात विकासाभिमुख कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.

