yuva MAharashtra जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांचा उत्साह; दरीबडची जिल्हा परिषद गटातील उमेदवारांचा विजयाचा मार्ग अधिक भक्कम!

जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांचा उत्साह; दरीबडची जिल्हा परिषद गटातील उमेदवारांचा विजयाचा मार्ग अधिक भक्कम!

जत वार्ता न्यूज
By -

पांडोझरीत जि. प. – पं. स. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद


जतवार्ता न्यूज नेटवर्क :
     जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पांडोझरी, तालुका जत येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरीबडची जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार श्री. सरदार पाटील तसेच तिकोंडी पंचायत समिती गणाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती नकोसा धर्मू शेंडगे यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली होती.
     या सभेदरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत आजवर झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला. तसेच आगामी काळातील विकासाचे नियोजन, गावपातळीवरील प्रश्न, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आदी विषयांवर सकारात्मक आणि आशादायी चर्चा झाली. जनतेचा वाढता विश्वास आणि कार्यकर्त्यांमधील जोश पाहता विजयाचा मार्ग अधिक भक्कम होत असल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून आली.
     सभेला मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की, विकास हाच केंद्रबिंदू ठेवून काम केल्यास जनतेचा विश्वास आपोआप मिळतो. पारदर्शक कारभार, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची तत्परता आणि सातत्यपूर्ण विकासकामांमुळे या निवडणुकीत निश्चित यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
     यावेळी जत नगरीचे प्रथम नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी सर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अण्णासाहेब गडदे, माजी नगराध्यक्ष अशोक बन्नेनवर साहेब, नगरसेवक परशुराम भैय्या मोरे, युवा नेते श्रीमंत तांबे, दरीबडचीचे सरपंच शिवानंद मुरडी, खंडनाळचे सरपंच ज्ञानेश्वर नरळी, पांडोझरीचे सरपंच महादेव पुजारी, करेवाडीचे सरपंच बाळासाहेब खरात, तिकोंडीचे सरपंच मुतू वड्डियार, अमोघसिद्ध देवस्थानचे पुजारी परमेश्वर वड्डियार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     सभेच्या शेवटी “जनतेचा विश्वास आणि विकासाचा संकल्प – विजय निश्चित!” असा निर्धार व्यक्त करत उपस्थितांनी उमेदवारांना भरघोस पाठिंबा देण्याचा विश्वास दिला.