yuva MAharashtra जत तालुक्यातील वीज प्रश्नावरून आमदारांना जाब; राष्ट्रवादीच्या इशाऱ्यानंतर पडळकरांची तातडीची बैठक

जत तालुक्यातील वीज प्रश्नावरून आमदारांना जाब; राष्ट्रवादीच्या इशाऱ्यानंतर पडळकरांची तातडीची बैठक

जत वार्ता न्यूज
By -

जत/प्रतिनिधी : 
     जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मनसूर चाचा खतीब यांनी तहसील कार्यालयावर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर तालुक्यातील वीज प्रश्न अधिकच तीव्र झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भूमिकेमुळे आमदार गोपीचंद पडळकर यांना जाग आली असून त्यांनी तातडीने महावितरण अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावल्याची माहिती मिळत आहे.
     दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांनीही प्रेस कॉन्फरन्समध्ये आमदार पडळकर यांना थेट जाब विचारत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. कोकरे म्हणाले की, जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात लोडशेडिंग सुरू असून संध्याकाळी ६ ते १० या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जात आहे. या काळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून शेतकरी व शेतमजुरांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
     अंधारामुळे वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना विंचू, साप यांसारख्या धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, “तालुक्यातील गंभीर वीज समस्येकडे लक्ष देण्याऐवजी आमदार पडळकर हे इतरांवर टीका करण्यात आणि जातीय सलोखा बिघडवणाऱ्या वक्तव्यांमध्ये व्यस्त आहेत,” अशी टीकाही कोकरे यांनी केली.
     या सर्व घडामोडींनंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेऊन वीज समस्येवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे समजते.