जत/प्रतिनिधी :
जत तालुका शिक्षक भारतीच्या वतीने जनगणना प्रशिक्षण ३० एप्रिलपूर्वी आयोजित करावे, अशी मागणी नायब तहसीलदार कोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शिक्षकांच्या सुट्टीचा कालावधी आणि जनगणनेचे नियोजित काम लक्षात घेऊन ही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, शिक्षकांना २ मे ते १५ जूनदरम्यान उन्हाळी सुट्टी असते. मात्र जनगणनेचे प्रत्यक्ष काम १५ मेपासून सुरू होणार असल्याने शिक्षकांना सलग किमान १५ दिवसांची सुट्टी मिळावी, यासाठी प्रशिक्षण ३० एप्रिलपूर्वी घेणे आवश्यक असल्याचे शिक्षक भारतीने स्पष्ट केले आहे.
याशिवाय, बीएलओ म्हणून काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे मानधन तातडीने अदा करावे, अशी मागणीही करण्यात आली. तसेच मराठा आरक्षण सर्वेक्षणात सहभागी झालेल्या काही शिक्षकांचे प्रलंबित मानधन त्वरित देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. जनगणना प्रक्रियेत ५३ वर्षांवरील शिक्षक, दिव्यांग कर्मचारी तसेच गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या शिक्षकांना सवलत देण्यात यावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी शिक्षक भारतीचे अध्यक्ष दिगंबर सावंत, उपाध्यक्ष अविनाश सुतार, सरचिटणीस रमेश कोळी, सहसरचिटणीस बाळासाहेब जायभाये, प्रमुख कार्यवाह श्रावण कोरे, काका पडळकर, जिल्हा संघटक रावसाहेब चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सोलनकर, विठ्ठल जायभाये, विजय लिगाडे, नवनाथ ढाकणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

