जत/प्रतिनिधी :
बीएलओवर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जत येथील शिक्षक संघटनांनी प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत संबंधित प्रकरणाची वस्तुस्थिती मांडत शिक्षकांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण देण्यात आले.
जत येथे आयोजित बैठकीत शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बीएलओ म्हणून काम करताना येणाऱ्या अडचणी आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या यांचा आढावा मांडला. निवडणूक प्रक्रियेत शिक्षकांवर येणारा कामाचा ताण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांकडेही लक्ष वेधण्यात आले.
या चर्चेदरम्यान प्रांताधिकारी नष्टे यांनी शिक्षक संघटनांचे म्हणणे ऐकून घेतले. संबंधित शिक्षकावरील गुन्हा मागे घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचे समजते.
बैठकीस विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष महेश शरणाथे, सहसरचिटणीस शशिकांत पाटील, जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, भाजप नेते नाथा पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार, राजाराम सावंत, बाबासाहेब जानकर, चंद्रकांत बंडगर तसेच इतर पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. याशिवाय स्थानिक प्रतिनिधी आणि काही ग्रामपंचायत पदाधिकारीही उपस्थित होते. या बैठकीमुळे बीएलओ प्रकरणात सकारात्मक तोडगा निघेल, अशी अपेक्षा शिक्षक संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

