माजी आमदार विलासराव जगताप, सुरेशराव शिंदे यांची घेतली सदिच्छा भेट; राजकीय चर्चांना वेग
शिवसेना नेत्या तथा साध्य फाउंडेशनच्या अध्यक्षा अँड. सौ. विद्या मोटे यांनी जत तालुक्यातील विविध विवाह सोहळ्यांना उपस्थिती लावत शहरातील अनेक मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वाढलेल्या राजकीय सक्रियतेकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
रेवनाळ येथे मच्छिंद्र वाघमोडे यांच्या चिरंजीवाच्या विवाह सोहळ्यास अँड. विद्या मोटे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी नवदांपत्याला शुभाशिर्वाद दिले. त्यांच्या उपस्थितीमुळे विवाह सोहळ्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विविध पक्षांचे कार्यकर्ते, युवा नेते आणि नागरिकांनी त्यांच्यासोबत फोटोसेशन करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यानंतर त्यांनी जत शहरातील युवा उद्योजक व प्रसिद्ध कापड व्यापारी सागर कोरे यांच्या “सागर भाऊबली कलेक्शन” या प्रतिष्ठानास सदिच्छा भेट दिली. तसेच मुचंडी परिसरातील तोळबोळवाडी येथे मलमे व चव्हाण कुटुंबीयांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहत नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, अँड. विद्या मोटे यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी जगताप यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच तालुक्यातील विविध प्रश्न, सामाजिक घडामोडी आणि राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीत विलासराव जगताप यांनी विद्याताई मोटे यांना राजकीय मार्गदर्शन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावेळी युवा नेते संग्राम जगताप उपस्थित होते.
त्यानंतर त्यांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे यांच्या निवासस्थानी भेट दिली. शिंदे कुटुंबीयांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेशराव शिंदे, गटनेते स्वप्नील शिंदे, डॉ. निखिल शिंदे, नगरसेवक इमरान गवंडी, प्रवीण गडदे, लक्ष्मण सिदरेड्डी आदी उपस्थित होते. या भेटीदरम्यानही स्थानिक राजकारणावर चर्चा झाल्याचे समजते.
अँड. विद्या मोटे यांच्या सलग भेटीगाठींमुळे जत तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने त्या राजकीय पातळीवर सक्रिय होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या हालचालींना भविष्यातील राजकीय पेरणी म्हणून पाहिले जात असल्याचे मत स्थानिक राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

