जत/प्रतिनिधी :
१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद केंद्रशाळा जिरग्याळ येथे वार्षिक परीक्षेचा निकाल पारदर्शक पद्धतीने जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या मूळ प्रश्नपत्रिका पालकांसमोर सादर करून गुणदानाची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली. या उपक्रमामुळे पालकांचा शाळेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
शाळेने शासनाच्या नवीन निकषांनुसार पारदर्शकतेवर भर देत प्रत्येक विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका, दिलेले गुण व सुधारणा आवश्यक असलेले मुद्दे पालकांना थेट समजावून सांगितले. त्यामुळे पालकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमात “उल्लास नवभारत साक्षरता अभियान” अंतर्गत साक्षर झालेल्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एका बाजूला स्वतःच्या साक्षरतेचा अभिमान आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पाल्यांच्या यशाचा आनंद, अशा दुहेरी आनंदात उपस्थित पालक सहभागी झाले.
कार्यक्रमास केंद्रप्रमुख श्री. रतन जगताप व वरिष्ठ मुख्याध्यापिका सोनवणे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी केंद्रप्रमुख रतन जगताप म्हणाले, पारदर्शक निकाल प्रक्रियेमुळे पालकांचा शाळेवरील विश्वास दृढ होतो. शिक्षणाच्या माध्यमातून कोणत्याही वयात प्रगती साधता येते.
मुख्याध्यापिका सोनवणे मॅडम यांनी सांगितले की, पालक साक्षर झाले की घराघरात शिक्षणाचे महत्त्व वाढते. निकाल हा केवळ गुणांचा आकडा नसून तो शिकण्याची प्रक्रिया आहे. शाळेने तयार केलेल्या संविधा आराखड्यानुसार घेतलेल्या चाचण्या व सराव परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाल्याचे निकालावरून दिसून आले. आपल्या मुलांची प्रगती जाणून घेण्यासाठी पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. यामध्ये संकपाळ सर, राठोड सर, मोरे सर, माळी मॅडम, कोरे मॅडम यांचा सक्रिय सहभाग होता. याप्रसंगी साक्षर झालेले सौ. गौराबाई बंडगर, बाबासाहेब शंकर कट्टीकर, आक्काताई रामू पाटील आदी उपस्थित होते.

