मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा
जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगूबाई यात्रेदरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी घटनास्थळी भेट देत दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.
मंगळवारी सायंकाळी यात्रेदरम्यान अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मंदिर परिसरात उभारण्यात आलेले पत्राशेड आणि भिंत कोसळून सहा भाविकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच जखमी भाविकांच्या प्रकृतीची विचारपूस करत उपचारासाठी आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
यावेळी बोलताना सावंत म्हणाले, “मरगूबाई यात्रेसाठी आलेल्या भाविकांवर ओढवलेली ही घटना अत्यंत वेदनादायी आहे. या कठीण प्रसंगी बाधित कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत.” दरम्यान, माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या पाठपुराव्याने आमदार विश्वजित कदम यांनी भारती विद्यापीठ परिवाराच्या वतीने दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक स्वरूपात प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
यावेळी बाबासाहेब कोडग, सुजय नाना शिंदे, लक्ष्मण तात्या चव्हाण, माजी सरपंच भगवंत जावीर यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

