जत | प्रतिनिधी:-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती देशभर उत्साहात साजरी होत आहे ही बाब आनंदाची आहे पण दुसऱ्या बाजूला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकर्त्यांना जो सामजिक कार्याचा, सत्तेचा आदर्श घालून दिला आहे त्याचे पालन होताना दिसत नाही. आजही दुष्काळी जतची जनता पाण्यासाठी चातकाप्रमाणे वाट पहात आहे. किमान पुढील जयंती पूर्वी राज्यकर्त्यांनी तहानलेल्या जतला पाणी देण्यासाठी आग्रही भूमिका निभावावी असे कळकळीचे आवाहन चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी केले.
तालुक्यातील सोन्याळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती विविध उपक्रमाने हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी त्यांचे हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माजी सभापती संतोष पाटील, सरपंच बसवराज तेली, सिद्धाण्णा बिराजदार, बसवराज बिरादार, राजू सरगर, सिद्धण्णा पुजारी, अशोक बिराजदार, सुरेश उमराणी, निवर्गी सर, सोमनिंग पुजारी, दशरथ पुजारी, चन्नाप्पा नंदुर, नितीन शिंदे, रफिक नदाफ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना हभप तुकाराम बाबा महाराज म्हणाले, २०१८ पासून आपण स्वतः पाणी संघर्ष समिती,मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून जत पूर्व भागातील पाण्यासाठी संघर्ष करत आहोत. जतला द्यायला पाणीच शिल्लक नव्हते हे कळायला आम्हाला ४० वर्षे लागली. ज्यावेळी पाण्यासाठी संख ते मुंबई मंत्रालय पायीदिंडी काढली तेव्हा तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जतला द्यायला पाणीच नसल्याचे सभागृहात सांगितले. तोपर्यत केवळ पाणी देणार अशी दिशाभूल करण्यात आली प्रत्यक्षात जतला द्यायला पाणीच नव्हते. या आंदोलनानंतर व भांडाफोड झाल्यानंतर तत्कालीन जलसंपदा मंत्री आ. जयंत पाटील यांनी वारणेतून जतला पाणी आरक्षित केले. जत पूर्व भागाला वरदान ठरणाऱ्या विस्तारित म्हैसाळ योजनेचे काम गतीने सुरू आहे. डिसेंबर पर्यत पाणी येईल असे सांगितले जात आहे, चांगली गोष्ट आहे पण यासाठी राज्यकर्त्यांनी राजकारण बाजूला ठेवत पाण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन बाबांनी केले.

