yuva MAharashtra गुरुपौर्णिमेला अनोखी गुरुदक्षिणा; शिष्यांना वृक्षरोपांची भेट | संख येथे २०० हून अधिक शिष्यांना पिंपळ व चिंचेची रोपे वाटप; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

गुरुपौर्णिमेला अनोखी गुरुदक्षिणा; शिष्यांना वृक्षरोपांची भेट | संख येथे २०० हून अधिक शिष्यांना पिंपळ व चिंचेची रोपे वाटप; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी : 
     गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुदक्षिणा स्वीकारण्याऐवजी शिष्यांनाच वृक्षांची भेट देत पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देणारा उपक्रम जत तालुक्यातील संख येथे उत्साहात पार पडला. श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने आयोजित या उपक्रमात २०० हून अधिक शिष्यांना पिंपळ व चिंचेची वृक्षरोपे भेट देण्यात आली.
     संख येथील चिक्कलगी भुयारी मठात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात तुकाराम बाबा महाराज यांच्या उपस्थितीत पादुका पूजन करण्यात आले. यानंतर पारंपरिक गुरुदक्षिणा स्वीकारण्याऐवजी तुकाराम बाबा महाराज यांनी आपल्या शिष्यांना पिंपळ व चिंचेची रोपे देत ती लावून जोपासण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
     यावेळी त्यांनी "वृक्षतोड रोखा, वृक्षलागवड करा" असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन केले. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि पावसाचे अनिश्चित स्वरूप लक्षात घेता वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
     या उपक्रमानिमित्त परिसरातून वृक्ष दिंडी काढण्यात आली. दिंडीत सहभागी झालेल्या शिष्यांनी वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती करत पर्यावरण संरक्षणाच्या घोषणा दिल्या. गुरुपौर्णिमेच्या दिवशी वृक्ष भेट देण्याचा हा अभिनव उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.
    यावेळी २०० हून अधिक शिष्यांना वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले. गुरुपौर्णिमेला अध्यात्मासोबत पर्यावरण संवर्धनाची जोड देणारा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला असून समाजात वृक्षलागवड व पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.