जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत तालुक्यातील अमृतवाडी फाट्याजवळ आज सकाळी एस.टी. बसचा भीषण अपघात होताहोताच टळल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. बसचा पुढील टायर अचानक फुटल्याने बस रस्त्याखाली घसरली, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत बसमधील सुमारे ५० प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जत आगाराची एस.टी. बस क्रमांक MH 14 BT 2902 ही अंकलगीहून वळसंग–अमृतवाडी मार्गे जतच्या दिशेने येत असताना अमृतवाडी फाट्याजवळ अचानक बसच्या पुढील बाजूचा टायर फुटला. टायर फुटताच बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला खाली घसरू लागली. काही क्षण प्रवाशांसाठी अत्यंत भयावह ठरले.
मात्र, चालकाने धीर न सोडता प्रसंगावधान राखले आणि मोठ्या कौशल्याने बस थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बस रस्त्याखाली उतरली असली तरी उलटली नाही. या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित राहिले.
बसमध्ये भीतीचे वातावरण;
अपघाताच्या क्षणी बसमध्ये एकच गोंधळ उडाला. काही प्रवाशांनी भीतीपोटी आरडाओरडा केला, तर काही जण अक्षरशः घाबरून गेले होते. काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
ग्रामस्थांची तत्काळ मदत;
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. यानंतर एस.टी. प्रशासन व पोलीस यंत्रणेला घटनेची माहिती देण्यात आली. काही वेळातच पर्यायी बसची व्यवस्था करण्यात येऊन प्रवाशांना सुरक्षितपणे पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.
अपघाताचे कारण व चौकशी;
बसचा टायर फुटणे हे अपघाताचे प्राथमिक कारण असल्याचे समोर आले आहे. या घटनेबाबत एस.टी. प्रशासनाकडून चौकशी सुरू असून बसच्या देखभाल व तांत्रिक स्थितीबाबत सखोल तपास केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सुटकेचा श्वास, चालकाचे कौतुक;
हा अपघात अत्यंत गंभीर स्वरूप धारण करू शकला असता; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला असून, संकटाच्या क्षणी संयम व सतर्कता दाखवणाऱ्या चालकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

