जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत शहरात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व नागरिकांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या पार्श्वभूमीवर व्यापारी संघटनांनी आज संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी बाजारपेठेतील मारुती मंदिरासमोर सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
या शोकसभेत विविध पक्षांच्या नेत्यांनी अजितदादा पवार यांच्या राजकीय व सामाजिक योगदानावर प्रकाश टाकत भावना व्यक्त केल्या. विलासराव जगताप म्हणाले की, “अजितदादा पवार यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते कणखर नेतृत्व असलेले, सर्वधर्मीयांना बरोबर घेऊन चालणारे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी तत्पर असणारे नेते होते. शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारधारेवर त्यांची ठाम निष्ठा होती.”
जगताप पुढे म्हणाले, “जत तालुक्यातील विस्तारित पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक असलेल्या विद्युत यंत्रणेचा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित होता. आम्ही थेट अजितदादांची भेट घेऊन समस्या मांडली. त्यांनी तात्काळ संबंधित विभागाला आदेश देत सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आणि कामाला गती मिळाली. हा त्यांचा निर्णयक्षम व कार्यतत्पर स्वभाव होता.”
सुरेश शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “अजित पवार हे अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक आणि वेळेचे काटेकोर पालन करणारे नेते होते. विकासाच्या भूमिकेतून भाजपसोबत राजकीय समन्वय ठेवत असतानाही त्यांनी पुरोगामी विचारांचा वारसा जपला. कार्यक्रम, सभा किंवा प्रशासनिक बैठक—कोणतीही बाब असो, वेळेच्या बाबतीत त्यांची शिस्त सर्वांना परिचित होती. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे.”
नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी म्हणाले, “अजितदादांची ही अचानक एक्झिट संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारी आहे. ग्रामीण भागाची, विशेषतः पश्चिम महाराष्ट्राची सखोल जाण असलेले आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेतृत्व आज हरपले आहे.”
यावेळी उपनगराध्यक्ष विक्रम ताड, महादेव पाटील, दिनकर पतंगे, संग्राम जगताप, मिथुन भिसे, अरविंद गडदे, अजित पाटील, विक्रम ढोणे, मच्छिंद्र वाघमोडे, शफीक इनामदार, चंद्रकांत गुडोडगी, नगरसेवक प्रकाश माने, परशुराम मोरे, प्रमोद हिरवे, इम्रान गवंडी, गौतम ऐवळे, विजयराजे चव्हाण, अमित दुधाळ, प्रताप शिंदे, प्रवीण गडदे आदी मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
शोकसभेत बोलताना अनेकांनी नमूद केले की, सत्तेत सहभागी असतानाही त्यांनी कधीही धार्मिक राजकारणाला प्राधान्य दिले नाही. राजकीय डावपेच, प्रशासनिक अनुभव आणि प्रसंगी निर्णयात धाडस दाखवण्याची क्षमता असलेले ते अलीकडच्या काळातील प्रभावी नेतृत्व होते. त्यांच्या योगदानाची आठवण जत तालुका आणि संपूर्ण महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

