“दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए…” या देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात जत तालुक्यातील आजी व माजी सैनिकांच्या वतीने ७७ वा भारतीय थल सेना दिवस मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. भारताच्या शौर्य, साहस आणि बलिदानाची परंपरा अधोरेखित करणारा हा गौरवसोहळा जत येथील अथणी रोडवरील शोभा मंगल कार्यालयात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांच्या अध्यक्षस्थानी जत नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी होते. यावेळी बोलताना त्यांनी भारतीय थल सेनेच्या योगदानाचा गौरव करताना सांगितले की, “भारतीय सेना म्हणजे केवळ शस्त्रसज्ज दल नव्हे, तर शिस्त, शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. सीमेवर उभा असलेला सैनिक आपल्या सुरक्षिततेसाठी कुटुंब, सुखसोयी आणि स्वतःच्या आयुष्याचा त्याग करतो. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या शहीदांचे ऋण कधीही फेडता येणार नाही.”
या सोहळ्याच्या अध्यक्षपदी माजी कॅप्टन उमाजी म्हारनूर (विशिष्ट सेवा मेडल) आणि कॅप्टन विजय कुरणे होते. एक्स सर्व्हिस मॅन वेल्फेअर असोसिएशन, जतचे अध्यक्ष माजी कॅप्टन बबनराव कोळी यांच्या उपस्थितीत सुभेदार मेजर सिद्धू गायकवाड व हवालदार महेशकुमार जगताप यांनी कार्यवाहक म्हणून जबाबदारी पार पाडली. यावेळी डॉ. रविंद्र आरळी यांचा आजी–माजी सैनिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
माजी कॅप्टन विठ्ठल मुचंडी, माजी कॅप्टन रावसाहेब साळुंखे (सेना मेडल) आणि हवालदार (से.नि.) अशोक संकपाळ (सेना मेडल) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी सैनिक व माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील उपस्थित होते. यावेळी शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या दिनाचे औचित्य साधून सकाळी ८ वाजता मिलिटरी कॅन्टीन, जत येथे ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर सकाळी ९ ते ११ या वेळेत शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत आजी–माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अब्बास सय्यद यांनी केले, तर आभार महेश जगताप यांनी मानले. सूत्रसंचालन उत्तम चाबरे व धनंजय नरळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एक्स सर्व्हिस मॅन वेल्फेअर असोसिएशन, जतचे खजिनदार हवालदार दत्तात्रय शिंदे, सचिव हवालदार बाळासाहेब भोसले, कॅप्टन भाऊसाहेब पाटील, सुभेदार मेजर सतीश शिंदे, कॅप्टन बाबासाहेब पांढरे, सुभेदार दत्ता शिंदे यांच्यासह पांडुरंग जाधव, नाना कुटे, मुऱ्याप्पा माने, नाना संकपाळ, दिपक खांडेकर, शहाजी शिंदे, सुशिलकुमार चव्हाण, संतोष माने, सुभेदार आगतराव जाधव, आनंदा गरडे, सुभेदार कृष्णा बुरुटे, नारायण वाघमोडे, डी. एच. जाधव, मानसिंग डफफळे सरकार, आनंदा हाक्के, प्रविण कदम, दत्तात्रय वाघमोडे, विठ्ठल डिस्कळ, सुर्यकांत यादव आदी आजी–माजी सैनिक व मान्यवर उपस्थित होते.


