yuva MAharashtra “जत आगारात अन्यायाचा उद्रेक – चालक बाबुराव व्हनखंडे यांचे बेमुदत उपोषण”

“जत आगारात अन्यायाचा उद्रेक – चालक बाबुराव व्हनखंडे यांचे बेमुदत उपोषण”

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     जत आगार व्यवस्थापक सुनंदा देसाई यांच्या मनमानी व अन्यायकारक कारभाराविरोधात चालक बाबुराव शंकर व्हनखंडे यांनी बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. शिस्त व आवेदन कार्यपद्धती डावलून, तसेच नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाला न जुमानता आपल्यावर करण्यात आलेली दंडात्मक कारवाई तात्काळ मागे घ्यावी, या प्रमुख मागणीसाठी हे उपोषण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
     व्हनखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणतीही ठोस चूक नसताना आपल्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यावर अमानुष पद्धतीने कारवाई करणे हे अन्यायकारक असून, “चूक नाही तर दंड का? चोर सोडून संन्यासाला फाशी” अशी परिस्थिती सध्या जत आगारात निर्माण झाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
     या प्रकरणात शिस्तभंगाची प्रक्रिया, चौकशी व सुनावणी यांची योग्य अंमलबजावणी न करता थेट कारवाई करण्यात आल्याने नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचा भंग झाल्याचे व्हनखंडे यांचे म्हणणे आहे. संबंधित कारवाई त्वरित मागे घेऊन न्याय द्यावा, अन्यथा जोपर्यंत योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत आपले उपोषण सुरूच राहणार असल्याचा ठाम इशाराही त्यांनी दिला आहे.
     या उपोषणामुळे जत आगारातील वातावरण तापले असून, कर्मचारी वर्गातही नाराजीचे सूर उमटत आहेत. प्रशासनाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.