जतवार्ता न्यूज नेटवर्क-
जगद्गुरु स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त जत येथे विवेक बसव प्रतिष्ठानच्या वतीने भव्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. विवेकानंद आश्रमाचे संस्थापक प. पू. शुकदास महाराज यांना प्रेरणास्थानी मानून स्थापन झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या व्याख्यानमालेस प्रमुख वक्ते म्हणून जागतिक कीर्तीचे धर्मभूषण श्री. गजाननदादा शास्त्री पवार उपस्थित होते. त्यांनी “युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद” या विषयावर उपस्थित श्रोत्यांना सखोल आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंदांचे विचार, राष्ट्रउभारणीतील त्यांचे योगदान, तरुणाईला दिलेला आत्मविश्वासाचा संदेश आणि भारतीय संस्कृतीचे जागतिक स्तरावर केलेले प्रबोधन यावर त्यांनी प्रभावी शैलीत प्रकाश टाकला. त्यांच्या विचारपूर्ण व्याख्यानाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख वक्ते व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. विवेक बसव प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष डॉ शालिवहन पटनशेट्टी व डॉ सौ. सरिता पटनशेट्टी यांनी कार्यक्रमाचे अत्यंत नेटके व शिस्तबद्ध नियोजन केले होते. कार्यक्रमादरम्यान प्रमुख वक्ते श्री. गजाननदादा शास्त्री पवार यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री. शालिवहन पटनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जत येथील प्रसिद्ध डॉक्टर मनोहर मोदी, शिवानुभव मंडपचे अध्यक्ष मल्लेश इटंगी तसेच मरुळशंकर स्वामी महाराज यांचा देखील विवेक बसव प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास जत शहर व परिसरातून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या श्रोत्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे महत्त्व आणि आजच्या काळातील त्यांची उपयुक्तता अधोरेखित करत कार्यक्रमाचे कौतुक केले. समाजप्रबोधन व वैचारिक जागृतीसाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी सागर पटनशेट्टी, सौ लिना पटनशेट्टी, डॉ राजाराम गुरव, डॉ विजय पाटील, प्रा मानेपाटील सर, डॉ विद्याधर किट्टद, सतीश मोदी, पापा कुंभार, शरणाप्पा अक्की, डॉ शंकर तंगडी, नगरसेविका डॉ सौ विना तंगडी, डॉ मल्लिकार्जुन काळगी, नगरसेवर विकास माने यांच्यासह परिसरातील महिला नागरिक व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शिल्पा पवार यांनी केले तसेच स्वागत व प्रस्तावना डॉ सौ. सरिता पटनशेट्टी यांनी केले. आभार सुभाष कोरे सर यांनी मानले.

