जतवार्ता न्यूज नेटवर्क;
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील श्री. क्षेत्र चिंचली येथील जागृत मायाक्का देवीची वार्षिक यात्रा यंदा रविवार दि. १ फेब्रुवारी ते सोमवार दि. ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत भरविण्यात येत आहे. यात्रेचा मुख्य दिवस गुरुवार दि. ५ फेब्रुवारी २०२६ असून याच दिवशी देवीचा महानैवेद्य (बोणी), पालखी व सबीना फेरी निघणार आहे.
विशेष बाब म्हणजे याच दिवशी महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान होणार असल्याने या यात्रेचा मतदानावर व निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होणार का, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
नवसाला पावणारी देवी, ‘कानड्या लाडी’ म्हणून ओळख;
मायाक्का देवी हे महाराष्ट्र व कर्नाटकातील भाविकांचे आराध्य दैवत असून देवीला ‘कानड्या लाडी’ असेही संबोधले जाते. लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. यात्रेपूर्वी जवळपास महिनाभर भाविक तयारीला लागतात. घरांची स्वच्छता, गोमूत्र शिंपडणे, बैलगाड्या सजविणे, बैल धुणे, रंगविणे, पारंपरिक वेशभूषा अशी तयारी केली जाते.
बैलगाडी, एस.टी. व ट्रॅव्हल्सचा महासागर;
आजही मोठ्या प्रमाणावर भाविक बैलगाडीने यात्रेला जातात. त्याचबरोबर एस.टी. महामंडळाच्या खास राखीव बसेस, खासगी ट्रॅव्हल्स, चारचाकी ते कंटेनरपर्यंत विविध वाहनांतून लाखो भाविक चिंचलीकडे निघतात. लाऊडस्पीकरवर कानड्या लाडीची गाणी, महिलांकडून देवीची गीते, असा भक्तीमय माहोल रस्तोरस्ती दिसून येतो. यात्रेदरम्यान अथणी जवळील कृष्णा नदी (हल्ल्याळ) येथे स्नान करूनच भाविक पुढे प्रवास करतात.
निवडणूक आयोगापुढे अहवाल;
या यात्रेसाठी सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक जातात. सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी या यात्रेसाठी सांगली जिल्ह्यातून पावणे दोन लाख भाविक जाण्याची शक्यता असल्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केल्याने ५ फेब्रुवारीच्या मतदान तारखेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यात्रेच्या तारखांमध्ये बदल, पण संभ्रम कायम;
मतदानाच्या दिवशीच मुख्य यात्रा असल्याने काही ठिकाणी भाविकांनी यात्रेचे नियोजन बदलले आहे. जत तालुक्यातील बाज व परिसरातील मायाक्का देवी भक्तांनी मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे दि. ४ फेब्रुवारी रोजी देवीला बोणी दाखविण्याचा निर्णय घेतला आहे.
तर भाजप आमदार श्री. गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी तालुक्यातील झरे गावातील बैलगाडी मालकांची बैठक घेऊन दि. २८ जानेवारी रोजी बैलगाड्या निघून दि. १ फेब्रुवारी रोजी देवीला बोणी दाखवून परत येण्याचे नियोजन केले आहे.
यात्रा की मतदान? उत्तर ५ फेब्रुवारीलाच;
दरवर्षी देवीच्या ओढीने जाणारे लाखो भाविक यंदा यात्रेच्या नियोजनात बदल करतील की मतदानाकडे पाठ फिरवतील, हे मतदानाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. यात्रेच्या दिवशीच मतदान होत असल्याने मतदार सहभागावर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाने व्यापक जनजागृती करावी, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
यंदाची मायाक्का देवी यात्रा केवळ धार्मिक नव्हे, तर राजकीय व प्रशासकीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाची ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

