yuva MAharashtra जत तालुक्यात निवडणूक यंत्रणा सज्ज; प्रक्रिया पारदर्शक व नियोजनबद्ध – निरीक्षक स्नेहल पाटील-भोसले

जत तालुक्यात निवडणूक यंत्रणा सज्ज; प्रक्रिया पारदर्शक व नियोजनबद्ध – निरीक्षक स्नेहल पाटील-भोसले

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या निवडणूक प्रक्रियेचा सखोल आढावा घेण्यासाठी निवडणूक निरीक्षक श्रीमती स्नेहल पाटील-भोसले यांनी दि. २२ जानेवारी २०२६ रोजी जत तालुक्याला भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण निवडणूक यंत्रणेची बारकाईने तपासणी करत प्रक्रिया पारदर्शक, कायदेशीर व नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्याबाबत समाधान व्यक्त केले.
     निरीक्षक पाटील-भोसले यांनी उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेस प्रत्यक्ष उपस्थित राहून कामकाजाची पाहणी केली. निवडणूक प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रशासनाने सर्व स्तरावर काटेकोर नियोजन केल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच वेळापत्रकानुसार सर्व बाबींची अंमलबजावणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
     भेटीदरम्यान आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली. आचारसंहितेच्या पालनासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, प्राप्त तक्रारी व त्यावर करण्यात आलेली कार्यवाही, भरारी पथक व स्थिर पथकांचे कामकाज याची त्यांनी तपासणी केली. यासोबतच निवडणूक प्रक्रियेसाठी कार्यरत असलेल्या ‘एक खिडकी प्रणाली’ला भेट देत उमेदवार व नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती घेतली. अर्ज वेळेत निकाली काढण्याची पद्धत व प्रशासनाची तत्परता पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
      तसेच त्यांनी निवडणूक कार्यालयास भेट देऊन सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही देखरेख व नोंदवहीची तपासणी केली. बिरनाळ व धावडवाडी येथील मतदान केंद्रांना भेट देत मतदानासाठी उपलब्ध भौतिक सुविधा, मतदारांसाठी करण्यात आलेली सोय-सुविधा व मतदान दिवशीची तयारी याची प्रत्यक्ष पाहणी केली.
     एकूणच जत तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे नियोजनबद्ध, पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने सुरू असून प्रशासन सर्व बाबींमध्ये सज्ज असल्याचा विश्वास निरीक्षक श्रीमती स्नेहल पाटील-भोसले यांनी व्यक्त केला.