आ. गोपीचंद पडळकर यांच्या मध्यस्थीने अपक्ष उमेदवार लक्ष्मण पाटीलसह नाराजांचा विजय रुपनूर यांना बिनशर्त पाठिंबा
येळवी पंचायत समिती गणातील उमेदवारीवरून निर्माण झालेली नाराजी अखेर दूर झाली असून भाजपमध्ये पुन्हा एकजूट निर्माण झाली आहे. बनाळी जिल्हा परिषद गटाचे भाजपचे अधिकृत उमेदवार सुनीलभैय्या पवार यांनी पुढाकार घेत, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. यामुळे येळवी गणात भाजपचे अधिकृत उमेदवार विजय रुपनूर सर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला.
बनाळी जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून सुनीलभैय्या पवार यांना तर येळवी पंचायत समिती गणातून विजय रुपनूर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र येळवी गणातून भाजपकडून निवडणूक लढविण्यास डॉ. समाधान जगताप, लक्ष्मण पाटील, राजाराम घुटुकडे, भानुदास राजगे, समाधान पडोळकर, दीपाली विठ्ठल नरळे, सखाराम घुटुकडे, कुमार साळे आदी अनेक इच्छुक होते. उमेदवारी न मिळाल्याने या सर्वांनी एकत्र येत लक्ष्मण पाटील यांना सर्वानुमते अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले होते.
या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये फूट पडू नये, तसेच येळवी गणात पक्षाची ताकद अबाधित राहावी यासाठी सुनीलभैय्या पवार यांनी सक्रिय भूमिका घेतली. जतचे विकासपुत्र आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, अपक्ष उमेदवार लक्ष्मण पाटील व नाराज कार्यकर्त्यांनी भाजपसोबतच राहावे यासाठी त्यांनी सातत्याने संवाद साधला.
डफळापूर येथे आमदार गोपीचंद पडळकर यांची अपक्ष उमेदवार लक्ष्मण पाटील व नाराज कार्यकर्त्यांसोबत महत्त्वपूर्ण भेट झाली. यावेळी आ. पडळकर यांनी, “भाजपने आजवर तुमच्यावर विश्वास ठेवला आहे, आता तुम्हीही पक्षासोबत ठामपणे उभे राहा,” असे आवाहन केले. त्यांच्या शब्दांना सकारात्मक प्रतिसाद देत अपक्ष उमेदवार लक्ष्मण पाटील व सर्व नाराज मंडळींनी सुनीलभैय्या पवार यांच्या नेतृत्वाखाली येळवी गणात भाजप एकसंघ राहील, अशी ग्वाही दिली.
याच भेटीत अपक्ष उमेदवार लक्ष्मण पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेत भाजपचे अधिकृत उमेदवार विजय रुपनूर सर यांना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे येळवी गणातील राजकीय चित्र स्पष्ट झाले असून भाजप अधिक बळकट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. एकसंघतेच्या या घडामोडीमुळे येळवी गणात भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

