yuva MAharashtra चांगल्या कामासाठी शारीरिक फिटनेस महत्त्वाचा; डॉ.सरिता पट्टणशेट्टी

चांगल्या कामासाठी शारीरिक फिटनेस महत्त्वाचा; डॉ.सरिता पट्टणशेट्टी

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
      सध्याच्या धावपळीच्या जगात आनंदी जीवन जगायचे असेल तर सर्वांनी शारीरिक फिटनेस कडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तुमचा शारीरिक फिटनेस चांगला असेल तरच तुम्ही चांगले काम करू शकाल.  शारीरिक फिटनेस चांगला नसेल तर तुमचे कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही त्यामुळे तुमच्या हातून कोणतेच काम चांगले होणार नाही म्हणून प्रत्येकाने आपल्या शारीरिक फिटनेस चांगला राखण्यासाठी व्यायाम, योग्य आहार, झोप आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे असे प्रतिपादन प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर सरिता पट्टणशेट्टी यांनी केले 
            त्या मौजे रामपूर (जत) येथे राजे रामराव महाविद्यालय, जत च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या "विशेष श्रमसंस्कार शिबिराप्रसंगी हळदी कुंकू समारंभ व महिलांचे आरोग्य या विषयावर प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अंकिता कोळेकर या होत्या. प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.मेहजबीन मुजावर यांनी उपस्थितांचे स्वागत करुन आपल्या प्रास्ताविकात विशेष श्रमसंस्कार शिबीराचा उद्देश सांगितला. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहाच्या अधिक्षक सौ.सुचेता पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ.सोमनाथ गायकवाड उपस्थित होते. 
         राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराप्रसंगी स्वयंसेवकांच्या वतीने रामपूर येथिल जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला हळदी-कुंकू समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून  बालरोगतज्ञ डॉ.सरिता पट्टणशेट्टी मॅडम उपस्थित होत्या. यावेळी डॉ.सरिता पट्टणशेट्टी यांनी महिलांच्या आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांना होणारे विविध आजार, रक्तक्षय (हिमोग्लोबिन कमी होणे), पोषण आहाराचे महत्त्व, स्वच्छतेची काळजी तसेच नियमित आरोग्य तपासणीचे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करुन महिलांनी आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी यांनी तर शेवटी आभारप्रदर्शन यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक, कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.