जतवार्ता न्यूज नेटवर्क;
सांगलीसह चार जिल्ह्यातील श्री. मायाक्कादेवी भक्तांच्यावतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतदान तारखेत बदल करण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाने अमान्य केल्याने मायाक्कादेवी यात्रेच्या नियोजनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. माध्यमिक शालांत परीक्षेचे कारण पुढे करीत आयोगाने ही मागणी फेटाळल्यामुळे आता श्री. मायाक्कादेवीला बोणी दाखविण्याचा कार्यक्रम मतदानाच्या दिवशीच पार पाडावा लागणार आहे.
कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील श्री. क्षेत्र चिंचली येथील मायाक्कादेवी यात्रेतील मुख्य देवीला बोणी दाखविण्याचा दिवस हा दि. ५ फेब्रुवारी रोजीच येत असून, हाच दिवस जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस आहे. सांगलीसह सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर आदी जिल्ह्यांतून लाखो भाविक या यात्रेसाठी उपस्थित राहत असल्याने मोठ्या प्रमाणावर मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर व माजी आमदार श्री. प्रकाश शेंडगे यांनी निवडणुका दि. ५ फेब्रुवारी ऐवजी दि. ८ फेब्रुवारी रोजी घ्याव्यात, अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर आयोगाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून यात्रेला जाणाऱ्या भाविकांची माहिती मागविली होती. सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी यात्रेसंदर्भात सकारात्मक अहवाल आयोगाकडे सादर केला होता.
मात्र, राज्यात दि. १० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या माध्यमिक शालांत परीक्षांचा हवाला देत राज्य निवडणूक आयोगाने मतदान तारखेत बदल करण्याची मागणी अखेर अमान्य केल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे या विषयावर पडदा पडला असून, मायाक्कादेवी यात्रेचा मतदानावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी प्रशासनाने व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्ष व स्थानिक नेतृत्वाकडून करण्यात येत आहे.

