जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दरीबडची जिल्हा परिषद गटात मोठी राजकीय घडामोड घडली असून, या गटातून इच्छुक उमेदवार असलेले श्रीमंत तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत, विकासासोबत जाणे हाच आपला प्रमुख उद्देश असल्याचे सांगत, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आग्रहाखातर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांना पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले.
दरीबडची जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून, त्यांचे मत जाणून घेतल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला. कार्यकर्त्यांनीही एकमताने विकासाच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतल्याने आपण उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे श्रीमंत तांबे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना तांबे म्हणाले की, “ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी लढवणार आहोत. दरीबडची जिल्हा परिषद गट विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, या गटातून विकासाची भूमिका अधिक भक्कमपणे मांडली जावी, हीच आमची भूमिका आहे.”
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून जत तालुक्यात सुरू असलेली रस्ते, पाणीपुरवठा, वीज, शिक्षण व इतर मूलभूत सुविधांची कामे लक्षात घेता, विकासासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. श्रीमंत तांबे यांच्या या निर्णयामुळे दरीबडची परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता असून, भाजपच्या उमेदवारांना याचा मोठा फायदा होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
एकूणच, व्यक्तिगत राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देत घेतलेला हा निर्णय दरीबडची जिल्हा परिषद गटासाठी निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

