yuva MAharashtra बिळूर गटात भाजपचा बुरुज ढासळला; निष्ठावंत कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

बिळूर गटात भाजपचा बुरुज ढासळला; निष्ठावंत कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला मोठा व निर्णायक राजकीय धक्का बसला आहे. बिळूर जिल्हा परिषद गटातील भाजपचे कट्टर, निष्ठावंत आणि वर्षानुवर्षे पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकत कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या घडामोडीमुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी, विस्कळीत संघटन आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय उघडकीस आला आहे.
     बिळूर गटातील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते सहदेव भीमाण्णा खांडेकर, भैराप्पा नरुटे, विठ्ठल काळे, सुरेश बिराप्पा शेळके, हुचाप्पा भीमाण्णा पुजारी, भीमा सत्याप्पा खांडेकर, संतोष विठ्ठल खांडेकर आणि रामा भीमा शेळके यांनी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीरपणे कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी जत तालुका कॉंग्रेस कमिटीचे पदाधिकारी, प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     या पक्षप्रवेशामुळे बिळूर गटासह संपूर्ण जत तालुक्यात कॉंग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून भाजपला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
     या सर्व कार्यकर्त्यांनी ग्रामपातळीवर भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन बूथ कमिटीपासून प्रचार यंत्रणेपर्यंत निष्ठेने काम केले होते. मागील विधानसभा निवडणुकीतही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. मात्र निवडणूक संपल्यानंतर भाजपने त्यांच्या योगदानाची कोणतीही दखल न घेता निष्ठावंत कार्यकर्त्यांना सातत्याने डावलल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
     जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर स्थानिक कार्यकर्त्यांचा अवमान करत ऐनवेळी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या भैराप्पा मासाळ यांना उमेदवारी दिल्याने बिळूर गटातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. याबाबत अनेक वेळा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष केल्याने अखेर भाजपची दुटप्पी भूमिका सहन न होऊन पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
     यावेळी बोलताना माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी भाजपवर जोरदार टीका करत सांगितले की, “भाजपमध्ये निष्ठेला किंमत नाही. आयत्या गाठी आणि आयात केलेल्या उमेदवारांनाच महत्त्व दिले जाते. ज्यांनी पक्ष उभा केला, त्यांनाच बाजूला सारण्याचे धोरण भाजपने स्वीकारले आहे. कॉंग्रेस पक्ष मात्र कार्यकर्त्यांच्या घामाची किंमत ओळखतो आणि त्यांना न्याय देतो,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
     या पक्षप्रवेशामुळे बिळूर गटातील भाजपचे संघटन अक्षरशः कोलमडले असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फटका बसण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. भाजपमधील नाराजीचा भडका उडाल्याने जत तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याच्या मार्गावर असून कॉंग्रेस पक्ष नव्या जोमाने निवडणूक मैदानात उतरल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.