yuva MAharashtra जतमध्ये उत्साहात पत्रकार दिन साजरा; विविध संस्थांकडून पत्रकारांचा गौरव

जतमध्ये उत्साहात पत्रकार दिन साजरा; विविध संस्थांकडून पत्रकारांचा गौरव

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     वृत्तपत्र पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दि. ६ जानेवारी १८३२ रोजी मुंबई येथून मराठी व इंग्रजी भाषेतील पहिले पाक्षिक वृत्तपत्र दर्पण सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ देशभरात ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त जत शहरात विविध सामाजिक संस्थांच्या वतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
     आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजांच्या राजवटीत देश गुलामगिरीत असताना पत्रकारितेचा प्रारंभ करून समाजप्रबोधनाचे मोठे कार्य केले. ते केवळ वृत्तपत्राचे जनक नव्हते तर देशातील पहिले प्राध्यापक म्हणूनही त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या विचारांचा व पत्रकारितेतील कार्याचा वारसा जपत आजचा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
     या निमित्ताने श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, जत यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जत येथील पत्रकारांचा शाल, बुके व पेन देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार दिनराज वाघमारे, नजीर चट्टरकी, मनोहर पवार, अनिल मदने, प्रमोद मेटकरी, यशवंत कोळी, जॉकेश आदाटे, श्रीकृष्ण पाटील, भागवत काटकर, प्रकाश कारगनिकर यांचा सत्कार करण्यात आला. हा सन्मान ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष अशोक तेली, सचिव श्रीकृष्ण पाटील तसेच गणेश सावंत, सतीश चव्हाण, लक्ष्मण मोरे, दीपक पाटणकर, अतुल मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
     याचप्रमाणे श्री माऊली फाउंडेशन, जत यांच्या वतीनेही पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. फाउंडेशनचे सचिव डॉ. दिनकर पतंगे, सहदेव माळीसर व पंढरीनाथ मदने यांच्या हस्ते पत्रकारांना गुलाबपुष्प, शाल, डायरी व पेन देऊन गौरविण्यात आले.
     ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनेही पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण यांनी पत्रकारांना डायरी, पेन व अध्यात्मिक पुस्तकांचा संच भेट देऊन गौरव केला. यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. अध्यक्ष यशवंतराव चव्हाण यांनी संघटनेने गेल्या तेवीस वर्षांत केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देत ज्येष्ठ नागरिकांच्या विविध अडचणी मांडल्या व त्या प्रश्नांना माध्यमांद्वारे वाचा फोडण्याचे आवाहन पत्रकारांना केले.
     कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार दिनराज वाघमारे तसेच मच्छिंद्र बाबर यांनी पत्रकारितेचे सामाजिक महत्त्व व जबाबदारी यावर आपले विचार व्यक्त केले. यावेळी पत्रकार राजकुमार कुलकर्णी, ऋग्वेद कुलकर्णी, यशवंत कोळी, जॉकेश आदाटे, गोपाल पाथरूट, अनिल मदने, विनायक माळी, श्रीकृष्ण पाटील, इब्राहिम शेख यांच्यासह अनेक पत्रकार व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
     पत्रकार समाजाचा आरसा असून लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत ठेवण्याची जबाबदारी पत्रकारांवर आहे, अशा भावना यावेळी सर्व वक्त्यांनी व्यक्त केल्या. जत शहरात साजऱ्या झालेल्या पत्रकार दिनामुळे पत्रकारांप्रती आदरभाव व्यक्त होत समाजात सकारात्मक संदेश गेला.
Tags: