yuva MAharashtra जत तालुक्यात निवडणूक रणधुमाळीला वेग; २३५ उमेदवारी अर्ज वैध; आठ अर्ज अवैध; अर्ज माघारीकडे सर्वांचे लक्ष

जत तालुक्यात निवडणूक रणधुमाळीला वेग; २३५ उमेदवारी अर्ज वैध; आठ अर्ज अवैध; अर्ज माघारीकडे सर्वांचे लक्ष

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया गुरुवारी पार पडली. या छाननी प्रक्रियेत जिल्हा परिषद गटांतील ९५ तर पंचायत समिती गणांतील १४० असे एकूण २३५ उमेदवारी अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजयकुमार नष्टे यांनी दिली. छाननीनंतर तालुक्यातील निवडणूक वातावरण अधिक तापले असून मंगळवार, दि. २७ जानेवारी हा उमेदवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
     छाननीदरम्यान विविध कारणांमुळे एकूण आठ उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. यामध्ये शेगाव व मुचंडी जिल्हा परिषद गटांतील प्रत्येकी एक अर्ज, तर उमराणी पंचायत समिती गणातील दोन अर्जांचा समावेश आहे. याशिवाय बाज, डफळापूर, उमदी व माडग्याळ येथील प्रत्येकी एक अर्ज अवैध ठरला आहे. विशेष म्हणजे प्रमुख राजकीय पक्षांच्या एकाही उमेदवाराचा अर्ज अवैध ठरलेला नाही, ही बाब लक्षवेधी ठरली आहे.
     दरम्यान, प्रमुख पक्षांनी अद्याप अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नसून, मंगळवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतरच अंतिम लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत भाजप व शिवसेना (शिंदे गट) स्वबळावर निवडणूक लढवत असून भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांनी आघाडी केली आहे. त्यामुळे तालुक्यात बहुरंगी राजकीय समीकरणे पाहायला मिळणार आहेत.
छाननीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारी अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे आहे—
जिल्हा परिषद गट :
जदरबोबलाद – ७, उमदी – १४, संख – १०, दरीबडची – १५, मुचंडी – ७, बिळूर – ८, डफळापूर – १६, शेगाव – ११, बनाळी – ७.
पंचायत समिती गण :
जदरबोबलाद – ५, माडग्याळ – ७, उमदी – ५, करजगी – ६, संख – १०, गिरगाव – १७, दरीबडची – ८, तिकोंडी – ५, मुचंडी – ५, खोजनवाडी – ५, बिळूर – १२, उमराणी – ५, डफळापूर – ११, बाज – ६, शेगाव – ९, कोसारी – ५, बनाळी – ९, येळवी – १०.

     अर्ज माघारीनंतर अंतिम उमेदवारांची संख्या निश्चित होणार असून त्यानंतरच जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील खऱ्या अर्थाने रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.