जतवार्ता न्यूज नेटवर्क | बिळूर,
बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघातील युवा नेते लक्ष्मण जखगोंड यांची सांगली जिल्हा परिषदेवर स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी बिळूर परिसरातील तसेच जत तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या मागणीला अधिकाधिक पाठिंबा मिळत असून स्थानिक पातळीवर चर्चा रंगू लागल्या आहेत.
लक्ष्मण जखगोंड हे गेली पंधरा ते वीस वर्षे जत तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असून त्यांनी विविध विकासकामांमधून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. बिळूर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी त्यांच्या पत्नी कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून गावासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून गावात विविध मूलभूत सुविधांची कामे मार्गी लागली असून बिळूरच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आहे.
बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघातही आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून विविध विकासकामे राबविण्यासाठी जखगोंड यांनी विशेष प्रयत्न केले. देवस्थान विकासासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच परिसरातील अनेक पानंद रस्त्यांना मंजुरी मिळवून देत त्यापैकी अनेक कामे पूर्णत्वास नेण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे.
सिंदूर (ता. जत) येथे हनुमान मंदिरासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून सध्या त्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे धार्मिक व सांस्कृतिक विकासालाही चालना मिळत आहे. अभ्यासू वृत्ती, लोकसंपर्क आणि जनतेसाठी अहोरात्र काम करण्याची तयारी यामुळे जखगोंड यांना परिसरात एक सक्षम व कार्यक्षम कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते.
आमदार गोपीचंद पडळकर यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले असून ते पडळकर यांचे कट्टर समर्थक म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळे त्यांची जिल्हा परिषदेवर स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यास बिळूरसह जत तालुक्यातील प्रलंबित विकासकामांना गती मिळेल व दुष्काळी तालुक्याच्या विकासाला नवे बळ मिळेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, “लक्ष्मण जखगोंड यांना स्वीकृत सदस्य करा” या मागणीसाठी परिसरात पाठिंबा वाढत असून संबंधित निर्णयाबाबत प्रशासन व पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

