yuva MAharashtra पारधी समाजात शिक्षणाची ‘नवी पहाट’! | वर्ध्यातून ‘क्रांतिवीर समशेर सिंग पारधी शिक्षण जागर यात्रा’चा दिमाखदार शुभारंभ

पारधी समाजात शिक्षणाची ‘नवी पहाट’! | वर्ध्यातून ‘क्रांतिवीर समशेर सिंग पारधी शिक्षण जागर यात्रा’चा दिमाखदार शुभारंभ

जत वार्ता न्यूज
By -


जतवार्ता न्यूज नेटवर्क | वर्धा :
     पारधी समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी ऐतिहासिक पाऊल उचलत वर्धा जिल्ह्यातून ‘क्रांतिवीर समशेर सिंग पारधी शिक्षण जागर यात्रा’चा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. “नको फासे, नको जाळे; लेकीला पाठवू आता शाळे” आणि “शस्त्राकडून शास्त्राकडे” अशा क्रांतिकारी घोषणांनी हिंगणघाट परिसर दुमदुमून गेला आणि शिक्षणाच्या नव्या परिवर्तनाची नांदी देण्यात आली.
      मुक्तीनगर (पिपरी) येथील पारधी बेड्यावरून या यात्रेचा शुभारंभ झाला. आदिवासी विकास विभाग, आदिवासी पारधी विकास परिषद (विदर्भ) आणि आदिवासी समशेर नगर पुरुष बचत गट (चांपा) यांच्या संयुक्त विद्यमाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे.
     या प्रसंगी अपर आयुक्त आयुषी सिंह (IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डिगंबर चव्हाण यांच्या हस्ते शिक्षण रथाला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी विविध सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी, शिक्षक, महिला बचत गट सदस्य तसेच मोठ्या संख्येने पारधी समाज बांधव उपस्थित होते.
     या यात्रेच्या माध्यमातून पारधी समाजातील मुलामुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, बालविवाह, बालमजुरी आणि पारंपरिक उपेक्षित जीवनपद्धतीतून मुक्त करणे हा प्रमुख उद्देश आहे. विशेषतः मुलींना शिक्षण देण्याबाबत जनजागृतीवर भर देण्यात येत असून, “लेकी शिकली तर समाज घडेल” हा संदेश प्रभावीपणे दिला जात आहे.
     यात्रेदरम्यान विविध गावांमध्ये भेटी देत शिक्षणाबाबत मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा यांचा प्रचार केला जाणार आहे. शिक्षण रथावर माहितीपर फलक, घोषवाक्ये आणि ध्वनीफितीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात येत आहे.
     पारधी समाज दीर्घकाळ सामाजिक उपेक्षेला सामोरा गेला असला, तरी आता शिक्षणाच्या माध्यमातून स्वाभिमान आणि प्रगतीचा मार्ग स्वीकारण्याचा निर्धार या यात्रेतून स्पष्ट होत आहे.

‘शस्त्राकडून शास्त्राकडे’ हा बदल केवळ घोषवाक्य न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा संकल्प पारधी समाजाने केला असून, या शिक्षण जागर यात्रेमुळे समाजात परिवर्तनाची नवी पहाट उजाडल्याची भावना व्यक्त होत आहे.