जतवार्ता न्यूज नेटवर्क | विजयपूर (कर्नाटक) :
विजयपूर जिल्हा येथील पोलिसांनी हलसंगी गावातील गाजलेल्या दागिन्यांच्या दुकान दरोडा प्रकरणाचा अवघ्या २० दिवसांत यशस्वी उलगडा करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपी जत तालुक्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
२६ जानेवारी रोजी दुपारी हलसंगी येथील भूमिका ज्वेलर्स या दुकानात काळ्या रंगाच्या होंडा युनिकॉर्न दुचाकीवरून आलेल्या दोन मुखवटा घातलेल्या दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत सुमारे २०५ ग्रॅम सोन्याचे व १ किलो चांदीचे दागिने लुटले होते. दरोड्यानंतर पळून जाताना आरोपींनी गोळीबार केल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी झाळकी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले होते. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी २० दिवसांच्या आत आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
अटक करण्यात आलेले आरोपी हनमंत (वय २८) व शिवराज (वय २८), रा. संख, ता. जत, जि. सांगली अशी त्यांची ओळख पटली आहे. पोलिसांनी आरोपींकडून लुटलेले सोने-चांदीसह तीन पिस्तुले, २६ जिवंत काडतुसे, एक एअरगन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे.
या यशस्वी कारवाईबद्दल लक्ष्मण बी. निंबरगी, पोलीस अधीक्षक यांनी तपास पथकाचे विशेष कौतुक केले असून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, या कारवाईमुळे जिल्ह्यातील सराफ व्यवसायिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, पोलिसांच्या तत्पर तपासाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

