yuva MAharashtra मनगटावर विश्वास ठेवा, यश निश्चित मिळेल – राष्ट्रपती पदक विजेत्या पुष्पलता दिघे चव्हाण यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

मनगटावर विश्वास ठेवा, यश निश्चित मिळेल – राष्ट्रपती पदक विजेत्या पुष्पलता दिघे चव्हाण यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क | जत :
     ध्येय गाठण्यासाठी नशिबावर अवलंबून न राहता स्वतःच्या कष्टांवर आणि मनगटावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. महाविद्यालयीन जीवनात गुरूजनांचे संस्कार आणि प्रामाणिक प्रयत्नांची जोड मिळाल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन राष्ट्रपती पोलीस पदक सन्मानित व महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्राच्या पोलीस उपअधीक्षक सौ. पुष्पलता दिघे चव्हाण यांनी केले.
     त्या जत येथील राजे रामराव महाविद्यालय येथे आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व त्यांच्या विशेष सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. नुकत्याच उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात आले असून, त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
     आपल्या मनोगतात दिघे चव्हाण म्हणाल्या की, “कोणत्याही संकटावर मात करण्याची जिद्द आणि आत्मविश्वास मला याच महाविद्यालयाने दिला. त्यामुळेच मी राष्ट्रपती पदकापर्यंत मजल मारू शकले. विद्यार्थी मित्रांनो, महाविद्यालयीन जीवनातील संस्कार हीच आयुष्याच्या यशाची खरी पायाभरणी असते.”

महाविद्यालयाचे खरे सौंदर्य विद्यार्थ्यांच्या यशात – डॉ. साळुंखे
     समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था चे आजीव सेवक व विद्या समितीचे अध्यक्ष डॉ. श्रीराम साळुंखे होते. अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, “भव्य इमारतीमुळे नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या यशामुळे महाविद्यालयाची ओळख निर्माण होते. आज आपल्या विद्यार्थिनीला राष्ट्रपती पातळीवरील सन्मान मिळणे हीच संस्थेची खरी शान आहे.”
     तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त राहण्याचा, आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवण्याचा व ध्येयपूर्तीसाठी सातत्याने परिश्रम करण्याचा संदेश दिला.

वर्षभरातील उपक्रमांचा आढावा;
     कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी स्वागत करून वर्षभरातील शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांचा आढावा मांडला. कार्याध्यक्ष प्रा. कृष्णा रानगर यांनी वार्षिक अहवाल सादर करत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात विविध विभागांनी राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अनुप मुळे यांनी क्रीडा क्षेत्रातील यशस्वी कामगिरीचा अहवाल सादर केला.

गुणवंतांचा गौरव;
     समारंभात विद्यावाचस्पती पदवी संपादन केलेल्या तसेच पेटंट मिळवलेल्या प्राध्यापकांचा शाल व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शिवाजी विद्यापीठ मध्ये पहिल्या दहामध्ये स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
     राष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ व जिल्हास्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील खेळाडूंनाही शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सतिशकुमार पडोळकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रवींद्र काळे यांनी केले. या सोहळ्यास प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.