जतवार्ता न्यूज नेटवर्क | jath :
जत ते घाटगेवाडी या सात किलोमीटर अंतराच्या मार्गावरील दुधाळवस्ती ते घाटगेवाडी दरम्यानच्या पाच किलोमीटर रस्त्याची दुरवस्था गंभीर बनली असून या कामास अद्याप मंजुरी न मिळाल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. या कामास लवकरात लवकर मुहूर्त द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा नगरसेवक विकास माने यांनी दिला आहे.
यापूर्वी संपूर्ण रस्ता खराब झाल्याने वाहतुकीस अयोग्य स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर जत-अथणी मार्गावरील गणपती मंदिर ते दुधाळवस्ती या दोन किलोमीटर अंतराच्या डांबरीकरणास मंजुरी मिळून काम पूर्ण झाले आहे. मात्र दुधाळवस्ती ते घाटगेवाडी या पाच किलोमीटर टप्प्याच्या डांबरीकरणास अद्याप मंजुरी नसल्याने वाहनचालकांना खड्ड्यांमधून कसरत करत प्रवास करावा लागत आहे.
या मार्गावरून दुधाळवस्ती, धानेश्वरी कॉलनी, राजाराम नगर, बसवेश्वर कॉलनी, विद्यानगर, शिक्षक कॉलनी, कुंभार प्लॉट, छत्रपती शिवाजी महाराज नगर, खासणीस प्लॉट, श्रीकृष्ण नगर, लक्ष्मीनगर आदी भागांतील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उर्वरित पाच किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणास मंजुरी देऊन काम हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

