जतवार्ता न्यूज नेटवर्क | jath :
जत तालुक्यातील साळमळगेवाडी व खिलारवाडी येथे कार्यरत ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय साळे यांना उत्कृष्ट प्रशासकीय कार्याबद्दल ‘आदर्श ग्रामपंचायत अधिकारी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य, जिल्हा सांगली यांच्या वतीने जिल्हा परिषद सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह येथे आयोजित संविधान अमृतमहोत्सवी सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त अजयनाथ थोरे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे आदी मान्यवरांच्या हस्ते श्री. साळे यांचा गौरव करण्यात आला.
श्री. साळे यांनी अमृतवाडी, येळदरी, कोळगिरी व रामपूर येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्य करताना विविध घरकुल योजना, रोजगार हमी योजना तसेच १५ वा वित्त आयोग, स्वच्छ भारत अभियान, स्मार्ट ग्राम योजना आदी उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. पिण्याचे पाणी, रस्ते व वीज सुविधा यांसारख्या मूलभूत कामांतही त्यांनी पुढाकार घेतला.
यापूर्वी सन २०१२-१३ मध्ये त्यांना जिल्हा परिषद सांगलीचा जिल्हास्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांच्या सातत्यपूर्ण व लोकाभिमुख कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आल्याबद्दल तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

