yuva MAharashtra जत येथील लिंगायत समाजासाठी स्वतंत्र २० एकर दफनभूमी द्या – सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत (पापा) कुंभार यांची मागणी

जत येथील लिंगायत समाजासाठी स्वतंत्र २० एकर दफनभूमी द्या – सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत (पापा) कुंभार यांची मागणी

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क | जत
     जत उमराणी रस्त्यालगत पत्रा कॉलनीजवळ असलेल्या लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, जत नगरपरिषदेने तातडीने लक्ष घालून लिंगायत समाजासाठी किमान २० एकर स्वतंत्र दफनभूमीची जागा उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी केली आहे.
     जत शहरातील लिंगायत समाजाची लोकसंख्या मोठी असतानाही त्यांच्या स्मशानभूमीच्या प्रश्नाकडे प्रशासनाने आजपर्यंत दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त केली जात आहे. जत उमराणी रस्त्यालगत पत्रा कॉलनीजवळ सध्या असलेली स्मशानभूमी ही समाजातील करबसय्या स्वामी यांनी स्वतःची सुमारे साडेचार एकर जमीन दान करून उपलब्ध करून दिली आहे. मात्र वाढती लोकसंख्या आणि अपुरी जागा यामुळे येथे गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.
दफन करताना उघडकीस येतात जुने मृतदेह;
     मृत व्यक्तीला दफन करण्यासाठी खड्डा खोदताना पूर्वी पुरलेले मृतदेह आढळून येत असल्याच्या घटना घडत असून, ही बाब अत्यंत वेदनादायक आणि समाजाच्या भावना दुखावणारी असल्याचे सांगितले जात आहे. मृत्यूनंतरही व्यक्तीला सन्मानाने अंतिम संस्कार करता येत नसल्याने समाजात तीव्र नाराजी आहे.
चोरी, घाण आणि अंधाराचे साम्राज्य;
     स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावरील लोखंडी दरवाजे चोरीस गेले असून, परिसरात सर्वत्र काटेरी झुडपे वाढली आहेत. लाईटच्या पोलवरील दिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करताना नातेवाईकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. परिसरात घाण व दुर्गंधी पसरलेली असून, पत्रेही चोरीला गेल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नगरपरिषदेकडून तातडीने निर्णयाची अपेक्षा;
     या पार्श्वभूमीवर जत नगरपरिषदेने हद्दीत योग्य ठिकाणी किमान २० एकर जागा दफनभूमीसाठी राखीव करून ती विकसित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जतचे नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी यांनी याबाबत पुढाकार घेऊन लिंगायत समाजाला न्याय द्यावा, असे आवाहन चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी केले आहे.
     लिंगायत समाजातील व्यक्तीला मृत्यूनंतरही दुर्गंधी व गैरसोयींचा सामना करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी एकमुखी मागणी समाजबांधवांतून होत आहे.