सांगली :
भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन यांच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सांगलीत दोन दिवसीय भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सर्वांसाठी खुला व विनामूल्य असून डेक्कन मॅन्युफॅक्चर असोसिएशन हॉल, जुने आरटीओ ऑफिस परिसर, साखर कारखाना, माधवनगर रोड, सांगली येथे कार्यक्रम पार पडणार आहेत.
सोमवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत ‘इच्छित एंटरटेनमेंट’ निर्मित ‘जागर संविधानाचा’ हे वैचारिक आणि सांगीतिक महानाट्य रंगणार आहे. या महानाट्यातून भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांचा प्रभावी कलात्मक आविष्कार सादर केला जाणार आहे. गीत, नृत्य आणि नाट्यरूप सादरीकरणाच्या माध्यमातून संविधानाचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून प्रेक्षकांना विचारप्रवर्तक आणि प्रेरणादायी अनुभव देण्याचे उद्दिष्ट आयोजकांनी व्यक्त केले आहे.
मंगळवार, दि. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत फ्युजन डान्स अकॅडमी, सांगली प्रस्तुत ‘संविधान चरित्रमाला’ हा विशेष कार्यक्रम सादर होणार आहे. गीत, नृत्य आणि शाहिरीच्या माध्यमातून भारतीय संविधानाची जडणघडण, त्यामागील विचारसरणी तसेच राष्ट्रनिर्मितीचा प्रवास प्रभावीपणे उलगडण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन सुरज वाघमोडे यांनी केले असून संगीत संयोजन महेश सोनुले यांनी केले आहे.
‘जागर संविधानाचा’ या महानाट्याद्वारे प्रेक्षकांना केवळ मनोरंजन नव्हे, तर संविधानाविषयी अभिमान, जागरूकता आणि कर्तव्यभावनेची प्रेरणा मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. प्रभावी मांडणी, दर्जेदार सादरीकरण आणि सामाजिक भान जपणाऱ्या या कार्यक्रमांमुळे सांगलीतील सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध होणार आहे.
भारतीय संविधानाच्या मूल्यांची जाणीव समाजात अधिक दृढ व्हावी, या हेतूने आयोजित या वैचारिक-सांस्कृतिक पर्वाचा लाभ सांगलीकर रसिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

