yuva MAharashtra संचमान्यतेतील त्रुटींमुळे शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती

संचमान्यतेतील त्रुटींमुळे शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क | जत;
     सन २०२५-२६ च्या संचमान्यतेमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्याने अनेक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक भारती जतच्या शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकारी श्री. राम फरकांडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
     शासनाने जाहीर केलेल्या संचमान्यतेत अनेक शाळांचा पट कमी दाखवण्यात आल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले. त्यामुळे संबंधित शाळांमधील उपशिक्षक तसेच वरिष्ठ मुख्याध्यापक पदे कमी होण्याचा धोका निर्माण झाला असून काही शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या त्रुटी तातडीने दुरुस्त करून शाळांना न्याय द्यावा, अशी मागणी शिक्षक भारतीच्या वतीने करण्यात आली.
     तसेच शासनाने संदर्भासाठी विहित केलेल्या २३ ऑक्टोबर २०२५ या दिनांकाबाबतही संभ्रम असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. शासनाने नेमका कोणत्या तारखेचा विद्यार्थीपट ग्राह्य धरला आहे, याबाबत स्पष्टता नसल्याने शिक्षण विभागात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदिग्धतेमुळे सन २०२५-२६ च्या संचमान्यतेबाबत सर्व शिक्षण विभागातून नाराजी व्यक्त होत असल्याचेही शिष्टमंडळाने सांगितले.
     दरम्यान, गटशिक्षणाधिकारी यांनी शिष्टमंडळाच्या मागण्यांची नोंद घेऊन वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली. यावेळी शिक्षक भारतीचे अध्यक्ष दिगंबर सावंत, उपाध्यक्ष अविनाश सुतार, जितेंद्र बोराडे, आर.आर. सावंत, प्रवीण राठोड, मोहन चौगुले आदी पदाधिकारी उपस्थित होते.