yuva MAharashtra संत गाडगे बाबांनी स्वच्छता-शिक्षणात देव पाहिला : जिल्हाधिकारी अशोक काकडे

संत गाडगे बाबांनी स्वच्छता-शिक्षणात देव पाहिला : जिल्हाधिकारी अशोक काकडे

जत वार्ता न्यूज
By -

समाज भूषण पुरस्कार वितरण; गुणवंतांचा सन्मान, रक्तदान-आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद


जतवार्ता
न्यूज नेटवर्क, sangli;
     “स्वच्छता आणि शिक्षण हाच खरा धर्म आहे. संत गाडगे बाबांनी स्वच्छतेत आणि शिक्षणात देव पाहिला. समाजाला भूषण ठरावे असे मुला-मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे,” असे प्रतिपादन सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले. जिल्ह्याच्या ठिकाणी परीट समाजासाठी जागा उपलब्ध करून सामाजिक सभागृह व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यासाठी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
     संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र परीट (धोबी) सेवा मंडळ, सांगली जिल्हा यांच्या वतीने आयोजित जयंती सोहळा, रक्तदान व आरोग्य शिबिर तसेच ‘समाज भूषण’ पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ उत्साहात पार पडला.
     कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक (भाजी मंडई) येथून संत गाडगे महाराज यांच्या पालखी मिरवणुकीने झाली. दैवज्ञ भवन येथे दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनानंतर मुख्य कार्यक्रमास प्रारंभ झाला. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शरद साळुंखे, सागर सुतार, मनोहर साळुंखे, सुनिताताई राक्षे, संजय साळुंखे, शर्मिलाताई शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
     कोल्हापूरचे शिवव्याख्याते सचिन परीट यांनी गाडगे बाबांच्या जीवनकार्यावर प्रभावी व्याख्यान देत स्वच्छता व शिक्षणाचा संदेश अधोरेखित केला.
     यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘समाज भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सकाळी ११ ते ४ या वेळेत आयोजित रक्तदान व आरोग्य शिबिरास समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
     कार्यक्रमाचे स्वागत जिल्हाध्यक्ष संजय साळुंखे यांनी केले तर आभार प्रा. रमेश गायकवाड यांनी मानले. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या समाज बांधवांमुळे जयंती सोहळा उत्साहात आणि अभूतपूर्व वातावरणात पार पडला.