जत/प्रतिनिधी :
जत तालुक्यातील रावळगुंडवाडी, मुचंडी, उंटवाडी आणि पाच्छापूर परिसरात मंगळवारी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. डाळिंब, द्राक्ष, कांदा, गहू, आंबा व लिंबू यांसारखी पिके पूर्णतः उध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहून त्यांनी सहानुभूती व्यक्त केली. "या कठीण प्रसंगी शेतकरी एकटा नाही, आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत," असा दिलासा त्यांनी दिला. यावेळी महसूल व कृषी विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असून या संकटाच्या काळात त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचे आमदार पडळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

