yuva MAharashtra सांगलीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून देवराज पाटील यांचा आज सत्कार; संघटनात्मक बैठकीचे आयोजन

सांगलीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून देवराज पाटील यांचा आज सत्कार; संघटनात्मक बैठकीचे आयोजन

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क | सांगली :
        सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल अधिक बळकट होत असून, पक्षाचे नेते जयंतराव पाटील यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनामुळे पक्षाची धुरा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. त्यांच्या मार्गदर्शनातूनच जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्याचे दिसून येत आहे.
     या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांचा सत्कार करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) सांगली जिल्हा यांच्या वतीने मंगळवार, दि. २४ मार्च रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
      यावेळी जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा सौ. संगीता संभाजीराव पाटील यांचाही सत्कार होणार असून, पंचायत समित्यांमध्ये निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभापतींचा देखील गौरव करण्यात येणार आहे.
     कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून, संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) कार्यालय, सांगली येथे दुपारी १ वाजता होणार असून, पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे यांनी केले आहे.