yuva MAharashtra जतच्या सुनिल कोटगोंडचा ‘उप-महाराष्ट्र केसरी’ किताब; राजे रामराव महाविद्यालयाचा मान उंचावला

जतच्या सुनिल कोटगोंडचा ‘उप-महाराष्ट्र केसरी’ किताब; राजे रामराव महाविद्यालयाचा मान उंचावला

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क, जत
:
     जत येथील राजे रामराव महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सुनिल कोटगोंड याने कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ९७ किलो वजनी गटात ‘उप-महाराष्ट्र केसरी’ हा मानाचा किताब पटकावला आहे. त्याच्या या यशामुळे महाविद्यालयाचे नाव राज्यासह देशभर उज्ज्वल झाले आहे.
     ग्रामीण भागातून आलेल्या सुनिल कोटगोंड याने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही नियमित सराव, शिस्तबद्ध दिनचर्या आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर त्याने कुस्तीच्या मैदानात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचे हे यश केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
     सुनिलच्या यशामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याची प्रेरणा निर्माण झाली असून, विशेषतः ग्रामीण भागातील युवकांसाठी तो आदर्श ठरत आहे. या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश पाटील, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अनुप मुळे व प्रा. दीपक कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
     याबाबत बोलताना प्राचार्य प्रा. डॉ. सुरेश पाटील यांनी सांगितले की, सुनिल कोटगोंड याचे यश महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे. कठोर परिश्रम, शिस्त आणि चिकाटीच्या जोरावर त्याने हे यश मिळवले आहे. भविष्यात तो महाराष्ट्र केसरी तसेच राष्ट्रीय स्तरावरही निश्चितच यश मिळवेल.
     सुनिलच्या या कामगिरीमुळे महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थी, शिक्षक व क्रीडाप्रेमींनी त्याच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.