yuva MAharashtra स्वागत कमानीऐवजी शाळा-अंगणवाड्यांसाठी निधी द्या; जत नगरपालिकेचा अर्थसंकल्प दिशाभूल करणारा – विक्रम ढोणे

स्वागत कमानीऐवजी शाळा-अंगणवाड्यांसाठी निधी द्या; जत नगरपालिकेचा अर्थसंकल्प दिशाभूल करणारा – विक्रम ढोणे

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क | jath :
     जत नगरपरिषदेने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सादर केलेला अर्थसंकल्प हा जतकरांची दिशाभूल करणारा असल्याची टीका युवा नेते विक्रम ढोणे यांनी केली आहे. स्वागत कमानी उभारण्याच्या निर्णयावर त्यांनी आक्षेप घेत, त्या ऐवजी शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाड्यांसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे.
     नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांनी शहरात दोन स्वागत कमानी उभारण्याचा प्रस्ताव मांडला असला, तरी नगरपालिकेला मिळणारा निधी हा प्राधान्याने मूलभूत सुविधा व गरजांवर खर्च होणे आवश्यक आहे, असे ढोणे यांनी स्पष्ट केले. शहरातील जिल्हा परिषदांच्या १४ प्राथमिक शाळा आणि अंगणवाड्यांच्या विकासासाठी निधी देणे अधिक गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
     दरम्यान, वाढीव पाणीपट्टी करावरही त्यांनी आक्षेप घेतला आहे. सध्या शहराला आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होत असताना कर वाढविणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतरच पाणीपट्टी वाढीचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
     शववाहिका सेवा मोफत करण्याच्या घोषणेबाबतही त्यांनी टीका केली. शववाहिका सेवा आधीपासूनच मोफत उपलब्ध असताना ती नवीन योजना असल्याचा आभास निर्माण केला जात असल्याचे त्यांनी म्हटले. खऱ्या अर्थाने नागरिकांच्या दुःखात सहभागी व्हायचे असल्यास स्मशानभूमीतील दहनक्रिया मोफत करण्याचा निर्णय घ्यावा, असे त्यांनी सुचवले.
     दरम्यान, डिजिटल जाहिरातींवरील वाढीव कर आकारणीचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत, त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. अन्यथा हा निर्णय केवळ घोषणांपुरताच राहू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.