yuva MAharashtra संशोधन हे समाजाच्या विकासासाठी व कल्याणासाठी असले पाहिजे- माजी प्रा. डॉ. डी. एन. काशीद

संशोधन हे समाजाच्या विकासासाठी व कल्याणासाठी असले पाहिजे- माजी प्रा. डॉ. डी. एन. काशीद

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क | jath :
     आजच्या डिजिटल युगात डेटा हे नवे इंधन असून त्याच्या योग्य विश्लेषणातून उद्योग, शिक्षण, आरोग्य, शेती आणि प्रशासन या क्षेत्रांमध्ये मोठे परिवर्तन घडत आहे. संगणकाचा शोध लागल्यापासून विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये मोठे बदल होत असून आपणही बदलत्या तंत्रज्ञानानुसार बदलले पाहिजे,पण आपले संशोधन हे समाजाच्या विकासाठी व कल्याणासाठी असले पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी संख्याशास्त्र विभाग प्रमुख डॉ.डी.एन.काशिद यांनी केले.
           ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे "राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त" सायन्स असोसिएशन व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने "डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजंट" या विषयावरती आयोजित चर्चासत्राच्या  उद् घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील हे होते. यावेळी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आप्पासाहेब भोसले, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.शिवाजी कुलाळ, उपप्राचार्य प्रा.कृष्णा रानगर व प्रा.कुमार इंगळे प्रमुख उपस्थित होते.
         डॉ.काशिद पुढे म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता ही केवळ तांत्रिक संकल्पना नसून ती समस्या सोडविण्याचे व निर्णय घेण्यासाठी प्रभावी साधन आहे. विद्यार्थ्यांनी डेटा विश्लेषण, मशीन लर्निंग आणि नवीन तंत्रज्ञानातील कौशल्ये आत्मसात करून संशोधनवृत्ती विकसित करावी, असे आवाहन करुन त्यांनी आधुनिक युगात डेटा सायन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचे वाढते महत्त्व अधोरेखित केले.
    यावेळी आपल्या अध्यक्षिय भाषणात प्राचार्य डॉ.सुरेश पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी पुस्तकातील ओळी वाचून प्रात्यक्षिक करण्यापेक्षा संशोधन दृष्टीने प्रात्यक्षिक करण्यावर भर दिला पाहिजे. नविन संशोधन किंवा नवनिर्मिती ही ध्येयवेडे झाल्याशिवाय होत नाही, म्हणून कोणतेही कार्य करताना मनापासून करा असे त्यांनी सांगितले. प्रारंभी संख्याशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सोमनाथ करांडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश सांगून उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.ललिता  सपताळ यांनी तर आभार डॉ.अण्णासो गुरव यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.वैभव चांडवले, प्रा.स्नेहा पाटील यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.