yuva MAharashtra चिक्कलगी भुयार मठात तुकाराम बीज निमित्त विविध कार्यक्रम | ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांचे कीर्तन; शेठ नानजीभाई ठक्कर यांची प्रमुख उपस्थिती

चिक्कलगी भुयार मठात तुकाराम बीज निमित्त विविध कार्यक्रम | ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांचे कीर्तन; शेठ नानजीभाई ठक्कर यांची प्रमुख उपस्थिती

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क | जत :
     वारकरी संप्रदायातील अत्यंत पवित्र मानला जाणारा तुकाराम बीज व वैकुंठगमन सोहळा यंदा चिक्कलगी भुयार मठ येथे भक्तिभाव, कीर्तन-भजन आणि हरिनाम गजरात साजरा होत आहे. गुरुवारी या सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून वारकरी संप्रदायातील प्रवचनकार व कीर्तनकार, चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांची उपस्थिती लाभणार आहे.
     या निमित्ताने संत तुकाराम महाराज यांच्या जीवनकार्याचा तसेच वैकुंठगमनाच्या अध्यात्मिक संदेशाचा उलगडा कीर्तन-प्रवचनातून करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली असून सायंकाळी भजन, प्रवचन व कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. संतवाङ्मयावर आधारित निरूपणातून भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन करण्यात आले.
      गुरुवारी सकाळी ९ वाजता काल्याचे कीर्तन होणार असून दुपारी १२ वाजता फुले व गुलाल उधळून वैकुंठगमन सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे. सोहळ्यास दानशूर शेठ नानजीभाई खिमजीभाई ठक्कर (ठाणावाला) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींचाही सहभाग अपेक्षित आहे. गावातील आजी-माजी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.
     भाविकांच्या सोयीसाठी मंडप, पिण्याच्या पाण्याची सुविधा, महाप्रसादाची व्यवस्था तसेच वाहनतळाची सोय करण्यात आली आहे. भजन मंडळे, वारकरी दिंड्या आणि टाळ-मृदंगाच्या निनादाने परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून जाणार आहे.
     तुकाराम बीज हा संत परंपरेचा संदेश जनमानसात पोहोचवणारा दिवस असल्याने सर्व भाविकांनी कुटुंबासह उपस्थित राहून हरिनाम गजरात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.