ध्वजारोहण, पूजन, विचारमंथनातून अभिवादन; विविध मान्यवरांची उपस्थिती
जत/प्रतिनिधी:
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जत शहरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. सकाळी ध्वजारोहण, प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर सायंकाळी भव्य मिरवणुकीने शहर दुमदुमून गेले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आ. गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, तर माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश शिंदे, नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, उपनगराध्यक्ष विक्रम ताड, पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल कांबळे, उपाध्यक्ष सिद्धार्थ साबळे, निखिल साबळे, विकास खरात तसेच गौतम ऐवळे, चंद्रशेखर गोब्बी, परशुराम मोरे, राजू यादव, सिद्धेश्वर जाधव, कुमार साळे, प्रभाकर जाधव आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत ज्येष्ठ नेते संजय कांबळे यांनी केले.
यावेळी प्रमुख वक्ते प्रा. विठ्ठल कांगणे यांनी “फुले-शाहू-आंबेडकरांच्या विज्ञानवादी विचारांची आजच्या काळात गरज” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांनी देशातील सत्ताकेंद्रे सर्वांसाठी खुली केली असून विशेषतः महिलांना अधिकार मिळवून देण्यात मोठा वाटा उचलल्याचे नमूद केले. शिक्षण व विज्ञानवादी दृष्टिकोनाच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीचा मार्ग त्यांनी दाखवला, असेही त्यांनी सांगितले.
सायंकाळी पाच वाजता भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. पारंपरिक वाद्य, ढोल-ताशा आणि डीजेच्या गजरात संपूर्ण शहर निनादून गेले. मिरवणुकीतील दोन कंटेनरवर सादर करण्यात आलेले स्त्रियांच्या प्रगतीचे तसेच सामाजिक संदेश देणारे फलक विशेष आकर्षण ठरले.
कार्यक्रमाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली असून, जत शहरासह तालुक्यातील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि आंबेडकरी जनसमुदायाने मोठ्या उत्साहात बाबासाहेबांना अभिवादन केले.

