yuva MAharashtra जत तहसील कार्यालयातील कारभारावर सवाल; महसूल मंत्र्यांकडे तक्रारीचा इशारा

जत तहसील कार्यालयातील कारभारावर सवाल; महसूल मंत्र्यांकडे तक्रारीचा इशारा

जत वार्ता न्यूज
By -

शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप; जि. प. सदस्य सुनील पवार आक्रमक


जत/प्रतिनिधी :
     जत तहसील कार्यालयातील अनागोंदी कारभारावर नाराजी व्यक्त करत जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार यांनी महसूल विभागावर गंभीर आरोप केले आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी होत असल्याचा आरोप करत त्यांनी महसूल मंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.
     माहितीनुसार, जत तहसील कार्यालयातील काही महसूल सहाय्यक व तांत्रिक अधिकाऱ्यांकडून काराजनगी परिसरातील शेतकऱ्यांना मागील सहा महिन्यांपासून कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. आवश्यक कागदपत्रांच्या कारणावरून कामे रखडवून ठेवली जात असल्याची तक्रारही समोर आली आहे.
     या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जि प सदस्य सुनील पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पवार यांनी तहसीलदारांची भेट घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारला. यावेळी पवार व कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे समजते. अखेर तहसीलदारांनी मध्यस्थी करत प्रकरण शांत केले.
     पवार यांनी आरोप केला की, महसूल विभागातील काही कर्मचारी नागरिकांची लुबाडणूक करत असून विविध परवान्यांसाठी २० ते ६० हजार रुपयांची मागणी केली जाते. कागदपत्रे अपूर्ण असल्याचे कारण देत नागरिकांना वारंवार फिरवले जात असल्याचीही तक्रार आहे.
     या सर्व प्रकाराबाबत तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली असून, यापुढेही अशा घटना सुरू राहिल्यास महसूल मंत्री बाळासाहेब बावनकुळे यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार करण्यात येईल, असा इशारा सुनील पवार यांनी दिला आहे.