जत तालुक्यातील वीजपुरवठा, शेतकरी व नागरिकांच्या विविध प्रशासकीय अडचणींबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुका अध्यक्ष मन्सूर खतीब यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे याना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात सध्या वीजपुरवठा अत्यंत विस्कळीत झाला असून नागरिक व शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्रस्त आहेत. विशेषतः सायंकाळी ६ ते १० या वेळेत होणारे वारंवार भारनियमन तातडीने बंद करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या काळात विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असून ग्रामीण भागात अंधारामुळे साप-विंचू यांसारख्या धोक्यांची शक्यता वाढत आहे.
तसेच शेतकऱ्यांना दिला जाणारा वीजपुरवठा कमी दाबाचा असल्याने कृषी पंप व्यवस्थित चालत नसून पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने योग्य दाबाने वीजपुरवठा करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसून तातडीने पंचनामे पूर्ण करून भरपाई वितरित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कुंभारी येथील तलाव फुटीमुळे बाधित शेतकऱ्यांनाही त्वरित मदत देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान, जत तहसील कार्यालयातील कारभाराबाबतही नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असून कामात विलंब व गैरवर्तनाच्या प्रकारांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
म्हैसाळ योजनेअंतर्गत पाणी तात्काळ सोडून तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा संबंधित वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल तसेच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी सांगली जिल्हा युवक अध्यक्ष विवेक कोकरे, उपसरपंच सुभाष पाटील, जालिंदर व्हनमाणे, अमोल कराडे, प्रतापराव शिंदे, शंकरराव गायकवाड, साहेबराव पाटील, बी आर पाटील, शफिक इनामदार, सविता जानकर, सविता काबुगडे आदीजन उपस्थित होते.

