जत/प्रतिनिधी :
लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जत शहरात सुरू असलेल्या आमरण उपोषणाला चौथ्या दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला असून संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. समाजाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुकारलेल्या या बंदला व्यापारी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला.
शहरातील प्रमुख बाजारपेठा, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे जत शहरात बंदचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत होता. या आंदोलनामुळे लिंगायत समाजाच्या मागण्यांबाबत जनतेमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे.
उपोषणकर्ते सागर कोरे यांनी यावेळी ठाम भूमिका मांडताना सांगितले की, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म मान्यता मिळावी, तसेच इतर प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण व्हाव्यात, यासाठी हा लढा सुरू आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा वारसा असलेल्या लिंगायत समाजाच्या मागण्या रास्त असून त्या मार्गी लावण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी भावना समाजबांधवांनी व्यक्त केली. समाजाच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या लढ्यात आम्ही खंबीरपणे उभे राहणार असल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. दरम्यान, उपोषण आणि बंदमुळे जत शहरात काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले असले तरी आंदोलन शांततेत पार पडल्याचे चित्र दिसून आले.

