जत/प्रतिनिधी :
जत शहरातील विध्यानगर ते पत्रकार नगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बांधण्यात आलेल्या बंदिस्त गटाराचे चेंबर उघडेच ठेवण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. बांधकाम पूर्ण झाल्यापासूनच हे चेंबर उघडे असल्यामुळे दुर्गंधी पसरत असून, त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सदर चेंबर रस्त्याच्या कडेला असल्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या लहान मुलांसाठी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या संदर्भात अनेक वेळा पालिका प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, संबंधित बंदिस्त गटाराचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचेही दिसून येत असून, काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही पुढे येत आहे.
प्रभागातील नगरसेवकांचेही दुर्लक्ष;या समस्येबाबत स्थानिक नगरसेवकांनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये रोष वाढत असून, संबंधितांनी तातडीने हस्तक्षेप करून उघड्या चेंबरवर झाकण बसवून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

