जत/प्रतिनिधी :
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती श्री क्षेत्र मुचंडी येथे श्री दरिदेवाची वार्षिक यात्रा गुरुवार दि. २ एप्रिल ते बुधवार दि. ८ एप्रिल २०२६ या कालावधीत भरविण्यात येणार असून मंगळवार दि. ७ एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे. या दिवशी पहाटे मूळ नक्षत्रावर सबिना मिरवणूक व पालखी उत्सव, तसेच महानैवेद्याचा प्रमुख सोहळा पार पडणार आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गोवा, तामिळनाडू, केरळ व तेलंगणा राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या यात्रेला मोठी गर्दी अपेक्षित आहे. मुख्य दिवशी पहाटे तीन वाजल्यापासून पालखी सोहळ्याला सुरुवात होऊन पालखीभेटीनंतर भंडाऱ्याची उधळण करण्यात येते. बुधवार दि. ८ एप्रिल रोजी दरिदेव नाट्यसंघ, कनमडी यांच्या वतीने ‘दरिदेव चरित्र’ या पौराणिक नाटकाचे सादरीकरण होणार आहे.
मुचंडी येथील श्री दरिदेव मंदिर हे प्राचीन व जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या यात्रेची सुरुवात दरवर्षी चैत्र पौर्णिमेपासून होते. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे श्री दरिदेवाचे मंदिर कर्नाटक राज्यातील तिकोटा तालुक्यातील कनमडी ग्रामपंचायत हद्दीत येते, तर त्यांची बहीण देवी जक्कमादेवीचे मंदिर महाराष्ट्रातील जत तालुक्यातील मुचंडी परिसरात ओढ्याच्या डोहावर आहे.
यात्रेबाबत प्रचलित आख्यायिकेनुसार, देवी जक्कमादेवीने आपल्या भावाच्या वियोगामुळे जलसमाधी घेतली होती. नंतर भगवान शंकर व माता पार्वती यांनी दोघांची भेट घडविल्याने यात्रेत प्रथम दर्शन व महानैवेद्याचा मान जक्कमादेवीला दिला जातो. भाविक प्रथम देवीचे दर्शन घेऊन नंतर श्री दरिदेवाचे दर्शन घेतात.
यात्रेतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘घुळी’ प्रथा. यात भाविक स्नान करून नवीन वस्त्रे परिधान करून अंबाडा वनस्पतीपासून तयार केलेल्या चाबकाने अंगावर फटकारे मारत देवाच्या नावाचा गजर करतात. सीमावर्ती भागात यात्रा भरत असल्याने कर्नाटक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच दोन्ही राज्यांच्या भाविकांसाठी स्वतंत्र एस.टी. वाहतूक व्यवस्था करण्यात येते. नवस पूर्ण झाल्याच्या श्रद्धेतून अनेक भाविक मंदिराच्या पायऱ्यांवर नारळ फोडून आपली मनोकामना पूर्ण झाल्याचे मानतात.
दरम्यान, देवस्थान मंदिर समिती, कनमडी यांच्या वतीने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, दर्शनरांग, भक्तनिवास, अन्नप्रसाद, स्वच्छतागृहे व वाहनतळ यांसह विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी समितीचे अध्यक्ष मल्लाप्पा तुंगळ, उपाध्यक्ष प्रशांतगौड पाटील, कार्यदर्शी बसवराज पुजारी व अन्य पदाधिकारी व सदस्य तयारीत व्यस्त असून मंदिर परिसरात जीर्णोद्धार व रंगरंगोटीची कामे सुरू आहेत.

