जत/प्रतिनिधी:
मोटेवाडी (ता. जत) येथे मरगुबाई मंदिराची भिंत कोसळून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष मन्सूर चाचा खतीब यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले व या दुःखद प्रसंगी पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे सांगितले.
या प्रसंगी बोलताना मन्सूर चाचा खतीब म्हणाले की, या दुर्घटनेत काही कुटुंबांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. शासनाच्या वतीने मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. तसेच जखमींवर मोफत व तातडीने उपचार व्हावेत, उपचारासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठीही प्रशासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी सांगितले की, या दुर्घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्याशी चर्चा करण्यात आली असून, संबंधित पीडितांना शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी तसेच जखमींवर तात्काळ उपचार व्हावेत यासाठी ते स्वतः प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
घटनास्थळी भेटीदरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष जालिंदर होनमाने, जिल्हा परिषद गटाचे युवा नेते अमोल कराडे, मोटेवाडीचे पोलीस पाटील व तानाजी मोठे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

